Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जून, २०२६

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यश जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ पुरस्कारार्थींना १ जुलै रोजी होणार पुरस्कार वितरण.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

दि.२७ जून २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘यश जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यास गतवर्षीपासून सुरुवात करण्यात आली आहे. समाजहितासाठी दीर्घकाळ मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. यावर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा सखोल आढावा घेऊन ‘यश जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिना निमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृह येथे आयोजित विशेष समारंभात निवड केलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

विद्यापीठामार्फत वर्धापनदिनी गौरविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी योगदान दिलेल्या व्यक्तींच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाच्या या ‘यश जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ साठी डॉ. अशोकराव कुकडे – लातूर (वैद्यकीय सेवा),  अनिल मेहेर – नारायणगाव ( कृषी व ग्रामीण विकास ), प्रा. दिलीप फडके – नाशिक ( साहित्य – संस्कृती व ग्राहक संरक्षण), डॉ. निरुपमा देशपांडे – मेळघाट, अमरावती (आदिवासी उद्योजकता व पर्यावरण ) आणि सौ. सीमा मिलिंद कांबळे – पुणे ( महिला उद्योग सक्षमीकरण) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व यश जीवन गौरव पुरस्कार सल्लागार व शिफारस समितीचे सदस्य सचिव डॉ. मधुकर शेवाळे यांनी दिली आहे.       

यानिमित्त कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, 

"मुक्त विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे विद्यापीठ नसून समाजाशी नाते जोडणारी ज्ञानसंस्था आहे. विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा देणे हा ‘यश जीवन गौरव पुरस्कार’चा मूलभूत हेतू आहे. अशा व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा सन्मान म्हणजे समाजातील सकारात्मक मूल्यांचा गौरव होय. भविष्यातही विद्यापीठ समाजपरिवर्तनाला प्रेरणा देणारे उपक्रम सातत्याने राबवित राहील."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा