*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
प्रजिमा-१२ अंतर्गत रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव (कि.मी. ०/०० ते २५/००) या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या सुधारणा व बळकटीकरणासाठी एडीबी (Asian Development Bank) योजनेंतर्गत २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांनी दिली.
रश्मी बागल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा–माढा मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज तसेच कायदा व सुव्यवस्था यांसंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. केम परिसरातील नागरिकांकडून रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. सदर मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सदर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एडीबी योजनेंतर्गत या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
एडीबी योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण व राज्य मार्गांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यात येते. तसेच ग्रामीण भागातील रस्ते मुख्य महामार्गांशी जोडून दळणवळण सुलभ करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या निधीमुळे केम व माढा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मार्गाचा दर्जेदार विकास होणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
लवकरच होणार भूमिपूजन
सदर रस्ते विकास प्रकल्पासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून संबंधित प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रश्मी बागल यांनी दिली.
प्रतिक्रिया
"करमाळा तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे हे सातत्याने सकारात्मक भूमिका घेत आहेत. कंदर–केम–रोपळे–कन्हेरगाव या रस्त्यासाठी मंजूर झालेला २०० कोटी रुपयांचा निधी हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आगामी काळातही तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकामे, आरोग्य सुविधा तसेच नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसह विविध मूलभूत सोयींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास आहे."
– रश्मी बागल
महिला प्रदेश उपाध्यक्षा, भाजप
तथा जिल्हा परिषद गटनेत्या, सोलापूर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा