*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*दिनांक २१ जून २०२६*
*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
येथील श्री. रणछोडदास कल्याण शहा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली या संयुक्त उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना योग शिक्षिका सौ. सायराभाभी हमीद आत्तार, योग शिक्षक चंद्रकांत देवकर, अशोक अनपट आणि देवराव मते यांनी योगासनांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून घेण्यात आली. "रोजच्या धावपळीच्या जीवनात योगाचा समावेश केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते," याबद्दल मार्गदर्शकांनी अनमोल सल्ला दिला.
योग साधना झाल्या नंतर शालेय परिसरात पर्यावरण संतुलनाचा संदेश देत देशी वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा, वृक्ष संजिवनी परिवाराचे सायराभाभी आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीदभाई आत्तार तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध वृक्षांची रोपे लावण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता या लावलेल्या झाडांचे उत्तम संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी सर्वांनी केला.
मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांनी यावेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी दोन्ही उपक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला. अत्यंत नेटके नियोजन आणि शिस्तबद्धतेमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. इंदापूर परिसरात या पर्यावरण पूरक, आरोग्यदायी उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगदाळे, सहशिक्षक संतोष दहिफळे व राधाकिसन साळवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा