Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ जून, २०२६

इंदापुरात होणार महा आरोग्य शिबिर, गरजूंवर होणार मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य सेवेबरोबरच शासकीय सुविधा देखील होणार उपलब्ध : नगराध्यक्ष भरत शहा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या  नेतृत्वाखाली इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरात लवकरच भव्य मोफत आरोग्य महाशिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तबगार उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त तसेच

श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष,ज्येष्ठ उद्योजक, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष तथा समाजसेवक मुकुंदशेठ शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा लोकोपयोगी, जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

 नगराध्यक्ष भरत शहा पुढे म्हणाले, या महा आरोग्य शिबिरामध्ये ग्रामीण भागातील

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि उपचारांपासून वंचित राहिलेल्या रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम इंदापूर तालुक्याच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे.

या शिबिरात राज्यातील नामांकित व अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आजारांची तपासणी, निदान, मार्गदर्शन, मोफत औषधोपचार तसेच आवश्यक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हृदय विकार, सर्व प्रकारचे कर्करोग, हाडांचे फ्रॅक्चर, किडनीचे आजार व स्टोन, गर्भाशयातील गाठी, मणक्याचे विकार, कान, नाक, घसा विकार, प्रोस्टेट, हायड्रोसिल, हर्निया, मेंदूविकार, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग तसेच स्त्रीरोग अशा विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया साठी पात्र रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या आरोग्य महायज्ञात आरोग्य सेवांबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेशनकार्ड दुरुस्ती, नवीन रेशनकार्ड नोंदणी, आधार कार्ड नोंदणी तसेच आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि शासकीय सुविधांचा संगम घडविणारा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या महाअभियानामुळे हजारो गरजू रुग्णांना उपचाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या रुग्णांसाठी हा आरोग्य महाकुंभ संजीवनी ठरणार असून अनेक कुटुंबांना नवजीवन देणारा ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.

इंदापूर शहरासह तालुका आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य आरोग्य महायज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने संचालक अंगद शहा यांनी केले आहे. सामाजिक,आरोग्य आणि जनकल्याणकारी उपक्रमांची परंपरा जपत इंदापूरमध्ये होणारा हा आरोग्य महाकुंभ तालुक्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण लोकसेवेचा अध्याय ठरणार असल्याचे मत उपनराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषद गट नेते शकिलभाई सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी तसेच विविध  नागरिकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा