*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- विर धरणातून नीरा नदीत २५ हजार क्युसेक्स तर उजनी धरणातून भिमा नदीत ३२०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निरा भिमा संगमावर २८२०० क्युसेक्सने पाणी वाहू लागले आहे. बावडा नरसिंहपूर परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने परीसर अद्यापही कोरडाच राहीला आहे.
पावसाने विर धरण परीसर व पुणे परिसरात जोरदार हजेरी लावल्याने विरसह त्यावरील धरणे तुडुंब भरली असून विर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून सुरूवातीला पाच हजाराने सोडले जाणारे पाणी वाढवून २५००० क्युसेक्सने करण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उजनी धरण ५५ टक्के भरले असून पुणे परिसरात पाऊस कमी झाल्याने वरून येणारे पाणी कमी झाले असल्याने उजनी भरण्याचा वेग मंदावला आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून सुरवातीला विजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक्सने पाणी सोडले. त्यानंतर नदी पात्रात २००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात सुरूवात केली. परंतू नीरा नदीतून पाणी सोडल्याने उजनीतून सोडण्यात येणारे पाणी कमी करून १६०० क्युसेक्सने करण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात ३२०० क्युसेक्सने पाणी वाहू लागले आहे. नीरा व भिमा नदीचे मिळून २८२०० क्युसेक्सने संगमावर पाणी वाहत आहे.
पावसाला सुरुवात होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही बावडा नरसिंहपूर परिसरात पावसाने अद्यापही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे विहीरींची पाणी पातळी वाढली नसून जमिनीची धुपही पुर्ण झालेली नाही. एकंदरीत बावडा मंडलवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शासनाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी, नागरिकांनी केली आहे.
फोटो - नरसिंहपूर येथील नीरा नदीत विर धरणातून सोडलेले पाणी खळाळून वाहत आहेत.
------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा