Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

*इंदापूर क्रिटिकेअर सेंटरमध्ये पहिली अँजिओग्राफी यशस्वी, इंदापूरच्या आरोग्य विश्वात मानाचा तुरा*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*मंगळवार, २४ जुलै २६*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



 

इंदापूर येथील इंदापूर क्रिटिकेअर सेंटर या ५० बेडच्या अद्ययावत रुग्णालयात दिनांक १९ जुलै २०२६ रोजी तालुक्यातील सरडेवाडी येथील पोपट दंडेल यांच्यावर पहिली यशस्वी अँजिओग्राफी संपन्न झाली आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉ. रोहन हेगडे, डॉ. संजय शहा, डॉ. सागर दोशी, डॉ. ऋषिकेश गार्डे, गोरख भोसले तसेच वैद्यकीय पथकाने ही अँजिओग्राफी केली. या यशाबद्दल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


​पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून शहरात परिसरातील पंचवीस गावातील नागरिकांची नेहमी वर्दळ असते. सध्या हदय विकारांच्या रुग्णांची वाढती संख्या असून त्यावर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. इंदापूर मध्ये वैद्यकीय सुविधा अद्ययावत नसल्याने  अकलूज, बारामती, पुणे, सोलापूर येथे पोहोचे पर्यंत अनेक रुग्ण रस्त्यात दगावतात. जर रुग्ण उपरोक्त ठिकाणी पोहोचले परंतु डॉक्टर जागेवर नसतील किंवा बाहेरगावी गेले असतील तर रुग्ण तेथे पोहोचून देखील उपयोग होत नाही. त्यामुळे इंदापूर येथे सुविधा होणे गरजेचे होते. त्या पार्श्वभूमीवर ​इंदापूर क्रिटिकेअर सेंटर हे एक अद्ययावत रुग्णालय असून येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, अतिदक्षता विभाग ( आय सी यू ), किडनी रुग्णांसाठी डायलिसिस ची सोय, चोवीस तास आपत्कालीन सेवा तसेच सर्व प्रकारच्या कंपन्यांचे इन्शुरन्स कॅशलेस सुविधांचा समावेश आहे. हे

​रुग्णालय नवीन स्टेट बँक तसेच बुलेट शोरूम च्या मागे असून येथे अनुभवी डॉक्टर्स, परिचारिका आहेत. त्यामुळे येथे तत्पर वैद्यकीय सेवा मिळते. आता त्यातच अँजिओग्राफी सुविधा उपलब्ध झाल्याने हदय विकारांच्या रुग्णांना ती वरदान ठरत आहे. यासंदर्भात डॉ. रोहन हेगडे म्हणाले, अँजिओग्राफी ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांची अचूक तपासणी करणारी महत्त्वाची चाचणी आहे. सध्या मानसिक ताणतणाव, व्यायामाचा व संतुलित आहाराचा अभाव, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा विविध हृदयविकाराचा संशय आल्यास अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. अँजिओग्राफी ही हृदयातील किंवा शरीरातील रक्तवाहिन्यांची तपासणी करण्याची आधुनिक आणि अचूक वैद्यकीय चाचणी आहे. या प्रक्रियेमध्ये हाताच्या किंवा मांडीच्या रक्तवाहिनीतून एक बारीक कॅथेटर आत सोडला जातो. त्याद्वारे विशेष कॉन्ट्रास्ट डाई दिली जाते आणि एक्स-रेच्या साहाय्याने रक्तवाहिन्यांचे चित्र घेतले जाते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का, असल्यास ते किती आणि कुठे आहे, हे स्पष्टपणे समजते. त्यामुळे अँजिओग्राफी मुळे हृदयविकाराचे अचूक निदान करता येते. योग्य वेळी स्टेंट बसविणे (अँजिओप्लास्टी) किंवा बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे का, याचा निर्णय घेणे सोपे होते. त्यामुळे गंभीर हृदयविकाराचा धोका कमी होण्यास आणि योग्य उपचार वेळेत सुरू करण्यास मदत होते. ही तपासणी सामान्यतः सुरक्षित मानली जाते. मात्र, कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणे काही किरकोळ धोके असू शकतात. त्यामुळे अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खालीच ही तपासणी करणे गरजेचे आहे. 

वेळीच निदान, योग्य उपचार आणि निरोगी जीवनासाठी हृदयाची नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासंदर्भात गोरख भोसले म्हणाले, रुग्णांना जास्तीतजास्त अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इंदापुरातील विविध डॉक्टरांनी एकत्र येऊन या रुग्णालयाची निर्मिती केली आहे. सर्वप्रथम किडनी रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्याचा बहुमान या रुग्णालयाने पटकावला आहे. आता हदय विकारांच्या रुग्णांना अँजिओग्राफी ही सुविधा सर्वप्रथम उपलब्ध करून देण्याचा बहुमान देखील या रुग्णालयास मिळाला आहे. आम्ही सर्व जण रुग्णांना जास्तीतजास्त अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी देखील जपली असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा