Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जुलै, २०२६

इंदापूर नगरपरिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार हल्ला प्रकरणी हल्लेखोरांवर 'मकोका'ची मागणी, दोन ते तीन दिवसात आरोपींना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पोलिसांना सूचना.

 इंदापूर डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९


इंदापूर नगरपरिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार हल्ला प्रकरणी आयोजित इंदापूर बंद ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. याप्रकरणी मोर्चा काढून तहसीलदार, पोलिसांना निवेदन देण्यात आले. तर अनिल पवार यांना सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे अशी लेखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.


इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक अनिल पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ४ जुलै रोजी विविध सामाजिक संघटना, विविध पक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देण्यात आले.


 यावेळी हल्लेखोरांसह कटामागील सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अनिल पवार यांना शासकीय सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. दोन ते तीन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 दिनांक २ जुलै रोजी नगरपरिषद बैठकीनंतर अनिल पवार हे नगरपरिषद इमारती समोर सहकारी नगरसेवकांशी चर्चा करत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क बांधून चारचाकी वाहनातून येत कोयता व चॉपर सारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दिवसाढवळ्या, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे इंदापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर उपस्थित नागरिक व सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचा स्पष्ट उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न गंभीर बनत असल्याचे मत व्यक्त करत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

 हल्लेखोरांसह या कटामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासह मकोका अंतर्गत कारवाई करावी, गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर हद्दपारीसह कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि इंदापूर शहर व तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

मोर्चानंतर झालेल्या सभेत वडार पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरकल, भाजपचे नेते प्रदीप गारटकर, भटके विमुक्त जमाती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी धोत्रे, नगरसेवक संजय शिंदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, किरण गानबोटे, दत्ता पवार, बाबा वजाळे, माऊली नाचण, राजश्री पवार, राजकुमार धोत्रे आदींची भाषणे झाली.  यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नगराध्यक्ष भरत शहा यांच्यासमवेत उपजिल्हा शासकीय रुग्णालयात जावून अनिल पवार यांची भेट घेतली. प्रकरणाची माहिती घेऊन, प्रकृतीची चौकशी केली. आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना केली. समाजविघातक प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संकेत ही पत्रकारांशी बोलताना भरणे यांनी दिले.

दरम्यान कडकडीत बंद मुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर मध्ये विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. अनेकजण सकाळचा नाश्ता करण्यासाठी निमगाव केतकी, बिजवडी व इंदापूर पंचक्रोशीत गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा