Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

*अॅड. तोसिफ शेख यांच्या पुढाकाराने कोंढव्यातील भीषण आगीत मृत्यू झालेल्या कामगाराच्या प्रकरणी इमारत व गोदाम मालकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.*

 *पुणे --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


पुणे, दि. २४ जुलै २०२६ : पुणे, कोंढवा खुर्द येथील सर्वे नं. ५, अश्रफ नगर, जुनैदी चौक, फिरदोस अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये दि. १७ जुलै २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत वेल्डिंगचे काम करीत असताना गुदमरल्याने एका फॅब्रिकेशन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी इमारतीचा मालक व गोदाम मालकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीतील आरोपानुसार, सदर बेसमेंटमध्ये थिनर, हार्डनर, ऑइल पेंट, टर्पेन्टाईन तसेच इतर ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे धोकादायक रासायनिक पदार्थ सक्षम प्राधिकरणांची आवश्यक परवानगी व परवाने न घेता बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले होते. तसेच, त्या ठिकाणी अग्निसुरक्षेसंदर्भातील कोणत्याही आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले नव्हते आणि बेसमेंटचा वापर धोकादायक व नियमबाह्य व्यावसायिक कामकाजासाठी करण्यात येत असल्याचा आरोप आहे.


सदर आग लागल्यानंतर मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी त्याच्या ठावठिकाण्याबाबत वारंवार विचारणा केली असता, त्यांना बेसमेंटमध्ये कोणीही अडकल्याचे नाकारण्यात आले. पोलीस व अग्निशमन दलालाही अशीच माहिती देण्यात आल्यामुळे बचावकार्य करण्यास विलंब झाला. आग विझविल्यानंतर पोलीसांनी बेसमेंटमध्ये प्रवेश केला असता, मृत कामगाराचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तेथून आढळून आला.


याशिवाय, सदर इमारतीचे अनधिकृत बांधकाम तसेच अपुरे व अडथळायुक्त प्रवेशमार्ग यांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या, ज्याचा परिणाम बचावकार्यावर झाला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर मृत कामगाराच्या पत्नीने आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी अॅड. तोसिफ शेख यांच्याकडे कायदेशीर मदतीसाठी धाव घेतली. प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास करून व पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५५९/२०२६ अन्वये इमारतीचा मालक रझा खान व गोदाम मालक जहांगीर अन्सारी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०५, २८७, ३२६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. तोसिफ शेख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, निष्काळजीपणा, धोकादायक व ज्वलनशील पदार्थांचा बेकायदेशीर साठा तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन यांमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणे ही केवळ अपघाताची घटना म्हणून पाहता येणार नाही. अशा बेजबाबदार व बेकायदेशीर कृत्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच, या संपूर्ण घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी न्यायव्यवस्थेकडून दोषींना शिक्षा होईल व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा