Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जुलै, २०२६

*ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. राजू बटगिरे यांची सर्वानुमते निवड* *वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्याला नवी दिशा देण्याचा निर्धार*

 *उमरगा--- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



उमरगा, --सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. राजू बटगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. फाउंडेशनच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. स्थापनेपासून अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण जाधव यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेतून पदाची सूत्रे प्रा. बटगिरे यांच्याकडे सोपवली.

ऍड. शीतल चव्हाण यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून सन २०१८ मध्ये मुळज येथे 'प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाची' स्थापना करण्यात आली. अभ्यासपूर्ण लेखन, परखड वक्तृत्व आणि सामाजिक भान यासाठी ओळख असलेल्या ऍड. चव्हाण यांनी वाचनालयाच्या माध्यमातून उमरगा-लोहारा परिसरात वाचन संस्कृती रुजविण्याचा व्यापक उपक्रम हाती घेतला. ग्रामीण भागात ज्ञान, विचार आणि सामाजिक जागृतीची चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.

या कार्यातून प्रेरित होऊन समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या आणि सन २०१९ मध्ये 'ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन'ची स्थापना करण्यात आली. ही संस्था अधिकृत नोंदणीकृत असून वाचन संस्कृतीचा प्रसार, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती, शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा, निवेदने, आंदोलने, कायदेशीर मार्गदर्शन, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अशा विविध माध्यमांतून जनहिताचे काम सातत्याने करत आहे. अल्पावधीतच फाउंडेशनने उमरगा व लोहारा तालुक्यातील सामान्य जनतेचा विश्वास संपादन करत त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारे व्यासपीठ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. राजू बटगिरे हे मागील सात-आठ वर्षांपासून फाउंडेशनच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. ते देवताळा-मातोळा येथील ज्युनिअर महाविद्यालयात भूगोल विषयाचे प्राध्यापक असून सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती यांबद्दल विशेष आस्था बाळगतात. ते सायकलिस्ट क्लब, लातूरचे सक्रिय सदस्य असून दरवर्षी लातूर ते पंढरपूर सायकलवारी करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतात. फाउंडेशनच्या विचारधारेशी असलेली त्यांची निष्ठा, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवडीनंतर भावना व्यक्त करताना प्रा. बटगिरे म्हणाले, "फाउंडेशनचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. वाचन संस्कृती रुजविणे, समाजातील वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे तसेच फाउंडेशनच्या ध्येय, विचार आणि मूल्यांशी पूर्ण प्रामाणिक राहून संघटनेचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध राहीन."

यावेळी मावळते अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी प्रा. बटगिरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ऍड. शीतल चव्हाण यांनीही त्यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास अधोरेखित करत, "प्रा. बटगिरे हे फाउंडेशनच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अभ्यासू, प्रामाणिक आणि निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनचे कार्य अधिक व्यापक होईल आणि समाजहिताची चळवळ अधिक बळकट होईल," असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. ख्वाजा शेख यांनी केले. यावेळी ऍड. शीतल चव्हाण, प्रा. युसूफ मुल्ला, ऍड. अर्चना जाधव, सत्यनारायण जाधव आणि प्रदीप चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर औरादे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी ऍड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, करिम शेख, धानय्या स्वामी, ऍड. ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, ऍड. अर्चना जाधव, किशोर बसगुंडे, बबीता मदने, प्रा. युसूफ मुल्ला, ऍड. बालाजी सोमवंशी, ऍड. मुल्ला, प्रदीप चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा