*उमरगा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उमरगा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था, प्रवेशद्वारावरच उभा राहिलेला नगर परिषदेच्या जंगम मालमत्तेचा कबाडखाना आणि सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबत असलेली अपारदर्शकता याविरोधात ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगर परिषद उमरगा यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केवळ सुशोभीकरण नव्हे, तर हुतात्मा स्मारकाच्या संपूर्ण पुनरुज्जीवनासाठी १२ ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, हुतात्मा स्मारक हे केवळ हुतात्म्यांच्या स्मृतींचे प्रतीक नसून अनेक पिढ्यांच्या बालपणाच्या, वाचनसंस्कृतीच्या, व्यायामाच्या आणि सामाजिक संवादाच्या आठवणी जपणारे सार्वजनिक ठिकाण आहे. कै. रमेश पाटील सार्वजनिक वाचनालय, गोलाकार वाचन दालन, उद्यान, मोठी वृक्षसंपदा आणि मुलांसाठीची खेळणी यांमुळे हा परिसर शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र आज जीर्ण झालेली खेळणी, अस्वच्छता, पावसाचे साचलेले पाणी, तुटलेल्या सुविधा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणाचे वैभव झपाट्याने लोप पावत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनातील सर्वाधिक गंभीर मुद्दा म्हणजे हुतात्मा स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नगर परिषदेच्या जंगम मालमत्तेची करण्यात आलेली अनियंत्रित साठवण. नगर परिषदेचे ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचे टँकर, विविध यंत्रसामग्री आणि इतर वाहने सार्वजनिक उद्यानाच्या परिसरात महिनोनमहिने उघड्यावर पडून आहेत. उन्हात, पावसात आणि वाऱ्यात ही वाहने अक्षरशः गंजत असून, जनतेच्या करातून खरेदी केलेली सार्वजनिक मालमत्ता देखभालीअभावी निकामी होत चालली आहे. शहराच्या प्रमुख सार्वजनिक ठिकाणाच्या प्रवेशद्वारालाच असा कबाडखाना निर्माण होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे
फाउंडेशनने यापुढे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित करत नगर परिषदेच्या जंगम मालमत्तेच्या व्यवस्थापनातील पारदर्शकतेवरही बोट ठेवले आहे. नगर परिषदेकडे नेमकी किती वाहने व यंत्रसामग्री उपलब्ध आहेत, त्यांपैकी किती कार्यरत आहेत, किती बंद अवस्थेत आहेत, किती वाहनांची दुरुस्ती प्रलंबित आहे, किती मालमत्ता निर्लेखित अथवा लिलावासाठी पात्र आहे आणि त्यावर आतापर्यंत किती सार्वजनिक निधी खर्च झाला, याची माहिती नागरिकांसमोर उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्ता ही लोकांची मालमत्ता असल्याने तिच्या वापरात, देखभालीत आणि व्यवस्थापनात संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र ही मालमत्ता उघड्यावर कुजत असून, त्याचे उत्तरदायित्व निश्चित होत नसल्याबद्दल फाउंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या सर्व वाहनांची व यंत्रसामग्रीची अद्ययावत नोंद करून त्यांचे तांत्रिक लेखापरीक्षण करावे, वापरात नसलेली वाहने नियमानुसार निर्लेखित किंवा लिलावात काढावीत, कार्यरत वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि हुतात्मा स्मारक परिसराचा कोणत्याही प्रकारच्या साठवणुकीसाठी वापर तातडीने बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे
याशिवाय धोकादायक घसरगुंडी हटविणे, आधुनिक व सुरक्षित खेळणी बसविणे, खेळण्यांखाली सुरक्षित फ्लोअरिंग करणे, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी ड्रेनेज व्यवस्था उभारणे, नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण, गोलाकार वाचन दालनाचे आधुनिकीकरण, संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण, हुतात्मा स्मारकासाठी स्वतंत्र पुनरुज्जीवन आराखडा तयार करणे आणि नागरिकांच्या सहभागातून विकास आराखडा तयार करणे अशा अन्य महत्त्वाच्या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
या निवेदनावर प्रा. राजू बटगिरे, ॲड. अर्चना जाधव, किशोर बसगुंडे, प्रदीप चौधरी, शबाना शेख-उडचणे, धानय्या स्वामी, करिम शेख, सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, ॲड. ख्वाजा शेख, बबीता मदने, प्रदीप मोरे, संतोष चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा