*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक-BLOंना शैक्षणिक व इतर प्रशासकीय कामकाजातून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे BLA-9 अमोल शिवाजीराव जाधव यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शिक्षक कर्मचारी BLO म्हणून कार्यरत आहेत. मात्र, संबंधित शिक्षकांना शाळेतील शैक्षणिक कामे, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून दिली जाणारी इतर कामेही पार पाडावी लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
या वाढत्या कामाच्या ओझ्यामुळे BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पूर्ण क्षमतेने आणि आवश्यक अचूकतेने करता येत नसल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत SIR मोहिमेच्या गुणवत्तेवर आणि परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी शिक्षक-BLOंना शाळेतील नियमित शैक्षणिक कामकाजातून तात्पुरती पूर्ण सूट देण्यात यावी, तसेच त्यांना केवळ SIR मोहिमेवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी तातडीने आवश्यक आदेश काढावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सादर करण्यात आली असून, प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार याकडे शिक्षक कर्मचारी व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा