*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मुंबई- राज्यात २ ऑगस्ट रोजी आज रविवारीही पावसाची सक्रियता कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा, तसेच सातारा घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहू शकतो. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी सध्या विशेष हवामानाचा इशारा किंवा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस किंवा काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी यलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भात वातावरण अधिक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत अलर्ट नसला तरी काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा आणि विजांच्या वेळी उघड्यावर थांबणे टाळावे. हवामान विभागाने वेळोवेळी जारी होणारे अपडेट्स लक्षात ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा