Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

कोयंबतूर येथे स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्रासाठी ९० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत विचारमंथन बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची घोषणा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा. शनिवार, १ ऑगस्ट २०२६, टाईम्स 45 न्यूज मराठी, सहसंपादक मो.९९२२४१९१५९


कोयंबतूर ( तामिळनाडू ) येथील आयसीएआर -शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ( एसबीआय ) मध्ये स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र ( शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स ) हे देशातील ऊस उत्पादक  शेतकरी व साखर उद्योगासाठी वरदान ठरणार असून या ऊस उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी संयुक्तपणे ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कोयंबतूर (तामिळनाडू) येथे शुक्रवारी दि. ३० जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.


 कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन सत्र, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय संवादानंतर हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कोयंबतूर येथील आयसीएआर एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त साखर आयुक्त अरुणराज व इस्माचे मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या सहकार्यातून  कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्कृष्टता केंद्र ( सेंटर ऑफ एक्सलन्स ) स्थापन करण्यासाठी साखर उद्योगाकडून ४५ कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून सुमारे ४५ कोटी रुपये या प्रमाणे संयुक्तपणे हा ९० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. ऊस उत्कृष्टता केंद्र हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन ऊस जातींचे संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अधिक ऊस उत्पादन, चांगला साखर उतारा आणि कमी खर्चात शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणारे विशेष ऊस उत्कृष्टता केंद्र असणार आहे. ऊस उत्कृष्टता केंद्रामध्ये उसाच्या वाणाचा कमी पाणी, जास्त पर्जन्यमान, क्षारपड जमीन आणि उष्ण हवामान यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे, खोडवा उत्पादनक्षमता आणि निविष्ठा-वापर कार्यक्षमता सुधारणे तसेच इथेनॉल, बायो-सीएनजी आणि ऊर्जेच्या गरजांसाठी वाण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. देशातील साखर उद्योग हा ६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना, सुमारे ५० लाख कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना आणि १ कोटींहून अधिक हंगामी मजुरांना आधार देत आहेत, ज्याची उलाढाल दीड लाख कोटींहून अधिक आहे. यामुळे १६ हजार कोटींहून अधिकचे कर शासनाला मिळतात.

उसाच्या वाढत्या तुटवड्यामुळे साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्वीच्या १५० ते  १६० दिवसांवरून आता सुमारे १०० दिवसांवरती आला असून केवळ सुमारे १०० दिवसांच्या उसाच्या उपलब्धतेवर वर्षभर प्रक्रिया पायाभूत सुविधा चालवणे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य होत चालले आहे, त्यामुळे या ऊस उत्पादना केंद्राचे महत्त्व वाढले आहे. महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय. ) तंत्रज्ञानाचा सुमारे २ लाख शेतकरी वापर करत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी देखील  ए. आय. उपक्रम अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.  साखर उद्योगाला केंद्र सरकार व विविध राज्य सरकार यांचे सहकार्य मिळत असल्याचे सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केले.

यावेळी आयसीएआर -एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज म्हणाले, या निधीमुळे पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्यास मदत मिळेल. त्यामुळे ऊस पिकामध्ये विविध रोगांसह उदभवणाऱ्या जैविक आणि अजैविक ताणांना तोंड देण्यासाठी जनुकशास्त्र आणि जीनोम एडिटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन, अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास सक्षम असणारे उसाच्या सुधारित वाणांच्या निर्मितीला संस्था प्रोत्साहन व पाठबळ देईल.

चौकट: कोयंबतूर ( तामिळनाडू ) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील ऊस संशोधनासाठीची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना आय.सी. ए.आर. अंतर्गत सन १९१२ मध्ये झाली असून, गेल्या ११० वर्षाहून अधिक काळामध्ये देशातील ऊस वाण विकासामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे, असे गौरोदगार या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा