Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

पंचगंगेच्या रुई पुलावर थरार! रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी!

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



घरगुती वादातून रागाच्या भरात घरातून मोटारसायकलवरून बाहेर पडलेल्या भावाने आपल्या बहिणीच्या डोळ्यांदेखतच रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे रुई पुलावर खळबळ उडाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पवन शेंडे हा इचलकरंजी येथे हातमागावर कामगार आहे. काल दुपारी त्याचा घरात वाद झाला. त्या रागातच तो आपली मोटारसायकल घेऊन बाहेर पडला. त्याला बहिणीने अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो सुसाट वेगाने नदीच्या दिशेने निघून गेला. त्याचवेळी तो आपल्या जिवाचे बरे-वाईट करेल, या भीतीने त्याची बहीण शेजाऱ्यांच्या दुचाकीवरून पाठोपाठ आली व नदीच्या पुलावर त्याला गाठले. मात्र, बहिणीला पाहताच त्याने आपली मोटारसायकल थांबवून तिच्या डोळ्यांदेखतच पुलावरून थेट पंचगंगा नदीत उडी घेतली व तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला.

भावाने आपल्यासमोरच नदीत उडी घेतल्याचे पाहून बहिणीने घटनास्थळी मोठा आक्रोश केला. तिचा आवाज ऐकून, तसेच घटनेची माहिती मिळताच पुलावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. नदीपात्रात पवन शेंडेचा शोध घेण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न सुरू केले. दरम्यान, हुपरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्कालीन यंत्रणेला कळविले. पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रक्षाबंधनाची राखी हातातच...

दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधनानिमित्त बांधलेली राखी आजही त्याच्या मनगटावर तशीच होती. आपले रक्षण करणाऱ्या भावानेच डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याने पवनच्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पवन विवाहित असून, त्याला पत्नी, दोन मुले, आई, वडील व एक बहीण आहे.

पाण्याचा वेग अन्‌ शोधमोहीम

पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पवन शेंडे हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वेगाने पुढे गेला. रेस्क्यू पथकाने इचलकरंजीपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीची खोली, पाण्याचा प्रवाह यामुळे अडचणी आल्या. त्यात सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा