इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील नामवंत डॉक्टर, समाजसेवक डॉक्टर सु.ना. कुलकर्णी यांचे उरुळी कांचन येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा एक मुलगी, सून जावई नातवंडे असा परिवार आहे.
डॉक्टर कुलकर्णी यांचा इंदापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता डॉ. कुलकर्णीं हे स्वातंत्र्य सेनानी कै.
ना. द. कुलकर्णी यांचे पुत्र होते. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ स्थापनेमध्ये कुलकर्णी कुटुंबीयांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी इंदापूर शहरामध्ये आरोग्य सेवा सुरू केल्याने त्याचा लाभ हजारो रुग्णांना झाला.
त्यांनी अत्यल्प फी मध्ये इंदापूरकरांची ५० वर्षे सेवा केली. इंदापूर मध्ये साहित्य, नाट्य, पत्रकारीता यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. बारामती येथील पवार कुटुंबीयांशी त्यांचे तीन पिढ्याचे संबंध होते. वसंतराव पवार ,
शरद पवार, अजित पवार तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, रत्नाकर महाजन यांच्या बरोबर त्यांचे कौटुंबिक संबंध होते. इंदापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले. त्यांनी शहरात एकता युवक संघटना स्थापन करून युवकांमध्ये जागृती निर्माण केली. या संघटनेमार्फत त्यांनी धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेले. त्यांच्यावर समाजवादी विचाराचा पगडा होता. ते राष्ट्रसेवा दल सैनिक होते. त्यांचा नानासाहेब गोरे, एस एम जोशी, भाई वैद्य, बाबा आढाव यांच्याशी जवळीक होती. समाजवादी विचाराचा पगडा असल्यामुळे गरीब सर्वसामान्य माणसाबद्दल त्यांच्या मनात सतत सहानुभूतीचा विचार होता. गेल्या काही वर्षापासून ते उरुळी कांचन या ठिकाणी राहत होते तरीही त्यांचे इंदापूरकरांशी ऋणानुबंध घट्ट जोडले होते. त्यांच्या जाण्याने इंदापूर शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचेवर ऊरळी कांचन येथील स्मशान भुमीतील विद्यूत दाहिनीत अत्यंसंस्कार करणेत आले.
यावेळी ऊरळी कांचन येथील ग्रामपंचायत उप सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व इंदापूर येथील प्रा. कृष्णा ताटे, हमीद आतार, प्रतिक शिंदे, जितेंद्र विंचू अंत्यविधीस उपस्थित होते.
राष्ट्रसेवादल छात्र भारती, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांचे इंदापूर शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना लवकरच इंदापूर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. कृष्णा ताटे व हमीद आतार यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा