Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

*राजकारणाच्या पलीकडची मैत्री… शरद पवार व श्रीनिवास पाटील यांच्या स्नेहबंधाला मनापासून सलाम!*

 *धोंडपा नंदे, संपादक गावगाथा मीडिया नेटवर्क*

 *मो:-9850619724*


आज पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात एक विलक्षण आणि मनाला भावणारा अनुभव घेता आला. केएलई समूहाचे पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण मा. शरदचंद्र पवार साहेब उपस्थित होते.त


पवार साहेबांचे भाषण गेली अनेक वर्षे ऐकत आलो आहे. वयाची ८६ वर्षे पूर्ण करूनही त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती, विषयाचा सखोल अभ्यास आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव आजही थक्क करून सोडतो. वय वाढत असले तरी विचारांची धार आणि निरीक्षणाची ताकद तितकीच प्रभावी आहे, हे आज पुन्हा एकदा जाणवले.

मात्र आजच्या कार्यक्रमात मला यापेक्षाही वेगळा आणि मनाला स्पर्शून जाणारा पैलू अनुभवायला मिळाला—शरद पवार साहेब आणि त्यांचे जिवलग मित्र, माजी खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब यांची मैत्री

श्रीनिवास पाटील साहेबांचेही वय ८६ वर्षे. त्यांनी आपल्या मनोगतात पवार साहेबांसोबतच्या जुन्या आठवणी, अनेक किस्से आणि सहवासातील प्रसंग अतिशय आपुलकीने सांगितले. पन्नास वर्षांहून अधिक काळाचा हा मैत्रीचा प्रवास असूनही आजही त्या नात्यातील जिव्हाळा, आपलेपणा आणि विश्वास तितकाच घट्ट असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

कार्यक्रमादरम्यान पाटील साहेब ज्या आत्मीयतेने आपल्या मित्राची काळजी घेत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होते, ते पाहताना मन भरून आले. राजकारण, सत्ता, पदे आणि सार्वजनिक जीवनातील असंख्य चढ-उतार पार करूनही मैत्रीचा धागा मात्र तुटू न देणे, ही गोष्ट आजच्या काळात निश्चितच शिकण्यासारखी आहे.

दोघेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज. दोघांनीही सार्वजनिक जीवनात मोठे योगदान दिले. अनेक दशकांच्या राजकीय प्रवासात असंख्य माणसे भेटली, परिस्थिती बदलली, काळ बदलला; पण एकमेकांसाठी असलेला विश्वास आणि मैत्रीचा जिव्हाळा कायम राहिला.

आज प्रत्यक्ष त्यांना एकत्र पाहताना त्यांच्या वावरण्यातील सहजता, एकमेकांशी केलेली चर्चा, जुन्या आठवणींवर रमलेले हास्य आणि एकमेकांबद्दलची काळजी पाहायला मिळाली. त्या क्षणी जाणवले की, खरी मैत्री ही वयाची, पदाची किंवा परिस्थितीची मोहताज नसते.

राजकीय आणि सार्वजनिक जीवनात मतभेद असू शकतात, विचारांचे प्रवाह वेगळे असू शकतात; पण व्यक्ती म्हणून एकमेकांबद्दलचा आदर आणि मैत्री जपता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणजे पवार साहेब आणि श्रीनिवास पाटील साहेब

आजच्या बदलत्या काळात नाती पटकन बदलतात, मैत्रीमध्येही स्वार्थाचे पदर दिसू लागतात. अशा परिस्थितीत पन्नास वर्षांहून अधिक काळ जपलेली ही मैत्री म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाते नाही, तर विश्वास, आपुलकी, काळजी आणि निस्वार्थ स्नेहाचा एक सुंदर आदर्श आहे.

आज त्या दोघांना जवळून पाहण्याचा योग आला आणि मनापासून एकच भावना उमटली—

मैत्री अशी असावी… काळ बदलला तरी न बदलणारी, परिस्थिती बदलली तरी न ढळणारी आणि आयुष्याच्या संध्याकाळीही पूर्वीइतकीच जिव्हाळ्याची!

पवार साहेब आणि श्रीनिवास पाटील साहेब यांच्या या अनोख्या, अर्धशतकाहून अधिक काळ टिकलेल्या मैत्रीला मनापासून सलाम!ही मैत्री पुढच्या पिढ्यांसाठीही नात्यांमधील विश्वास आणि जिव्हाळ्याचा आदर्श ठरो, हीच मनापासून शुभेच्छा

*धोंडपा नंदे, संपादक गावगाथा मीडिया नेटवर्क*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा