इंदापूर, डॉ. संदेश शहा.
बुधवार, ९ सप्टेंबर २०२६
सध्याच्या काळात व्यसन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदयार्थी आणि युवकातील या वाढत्या व्यसनाच्या सवयीमुळे आरोग्य, कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये नशामुक्तीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केल्यास विद्यार्थी व समाजातील इतर घटकांमध्ये अंमली पदार्थ व इतर प्रकारच्या व्यसनांविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल. सदर विषयाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी, प्रशिक्षण आयोजन व नियोजन, समन्वय व समुपदेशन इ. साठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने प्रा. धनंजय शालिनी शामराव देशमुख यांची सोलापूर जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
प्रा. देशमुख हे अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे उच्च माध्यमिक विभागाकडे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य करतात. देशमुख यांच्या माध्यमातून मागील१९ वर्षांपूर्वी सुरू झालेला विधायक ३१ डिसेंबर-दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी राबविला जातो. व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून त्यांनी पारंपारिक पद्धतीने होळी न साजरी करता तंबाखूजन्य पदार्थांची होळी करत चला व्यसनांची होळी करूया निरोगी जीवन जगूया हा उपक्रम अनेक वर्ष राबवितात. २६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन तसेच महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावे यासाठी ते अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रा. देशमुख हे सदगुरू श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक असून त्यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर संचलित योग महाविद्यालय शिरपूर जि. धुळे येथून एम ए योगशास्त्र ही पदवी संपादन केली आहे. तसेच ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे मान्यता प्राप्त योग शिक्षक आहेत. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला असून त्यांनी आतापर्यंत ४४ वेळा रक्तदान केले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ते सर्पअभ्यासक म्हणूनही लोकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील सापाबद्दल असणारे गैरसमज व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दूर करतात. ते व्यसनमुक्तीच्या कार्यासोबतच श्रीनाथ परीवार या समूहाच्या माध्यमातून अनाथ, अपंग, निराधार व गोरगरिबांसाठी कार्य करतात.
प्रा. देशमुख यांच्या निवडीबद्दल कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे, इंदापूर व्यसनमुक्त युवक संघाचे तानाजी पांडुळे महाराज, डॉ. प्रताप कदम, निळकंठ कदम, माजी पंचायत समिती सदस्य बापूसाहेब चंदनशिवे, वडापुरी ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक, व्यसनमुक्त युवक संघाचे सदस्य, श्रीनाथ परीवाराच्या सदस्य यांनी अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा