इंदापूर, डॉ . संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
रविवार, ६ सप्टेंबर २०२६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून सुरू असलेली ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या प्रेरणादायी मालिकेचा शुभारंभ इंदापूरच्या नगरसेविका दीप्ती राऊत यांच्या हस्ते स्क्रीनचे बटण सुरु करुन करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पार्टीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण विभागाचे राज्यप्रमुख तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ही मालिका यूट्यूबच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. समाजातील अज्ञान, अन्याय, जातीय विषमता आणि स्त्रियांवरील अत्याचारां विरुद्ध त्यांनी संघर्ष करून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दिली.
या मालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्याची माहिती मिळणार असून, त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजातील सकारात्मक बदलासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळणार आहे.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते शकीलभाई सय्यद म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून ही प्रेरणादायी मालिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि मानवतेची मूल्ये रुजविण्यास मदत होणार आहे.
यावेळी माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, महेश लोंढे, नानासाहेब चव्हाण, ह.भ.प.बलभीम राऊत, सुरज धाईंजे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या समता मखरे, सतिश कोल्हे,अधीक्षक अनिल ओहोळ, लता सातपुते, अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा