Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

उजनीतील सौर प्रकल्पाविरोधात पळसदेव येथे शेकडो मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन; तीन महिला बेशुद्ध, १५ दिवसात जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाचे आश्वासन !

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६  

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९


उजनी धरण क्षेत्रावरील १४०० मेगावॅटचा प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मासेमारीचा खाजगी ठेका देण्याची पद्धत तातडीने रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील पुनर्वसित पळसदेव येथे भूमिहीन धरणग्रस्त मच्छीमारांनी ३१ ऑगस्ट रोजी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाण्यात उतरून तीव्र जलसमाधी आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सुमारे तीन तास पाण्यात राहिल्याने तीन महिला आंदोलक बेशुद्ध पडल्याची घटना घडली.



दरम्यान उजनी धरण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी घटनास्थळी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आंदोलनकर्ते यांची प्रतिनिधी व जलसंपदा मंत्री यांची १५ सप्टेंबर पर्यंत भेट घडवून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन आठ तासानंतर दिनांक १५ सप्टेंबर पर्यंत स्थगित करण्यात आले. योग्य तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य मच्छीमार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनास इंदापूर नागरी संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.


   सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती च्या वतीने जलसमाधी आंदोलन पळसदेव येथे जाहीर करण्यात आले होते. उजनी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आणि ठेकेदारी पद्धत रद्द करा, भूमिपुत्रांना न्याय द्या या घोषणांनी आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांसह शेकडो भूमिहीन मच्छीमार सहभागी झाले होते.



 गेल्या महिन्यात सोलापूर येथे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे मच्छीमार संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने मच्छिमारामध्ये असंतोष होता. त्याचे रूपांतर जलसमाधी आंदोलनात झाले. सोमवार सकाळ पासून सुरू असलेले आंदोलन दुपारी अडीच वाजता अधिक तीव्र झाले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नाही, अशी आग्रही भूमिका घेत आंदोलक थेट जलाशयात उतरले. यावेळी इंदापूर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता, मात्र आंदोलकांच्या निर्धारापुढे प्रशासनाला बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

 आम्ही भूमिहीन धरणग्रस्त आहोत. धरणासाठी आमच्या जमिनी, घरे गेली. आता उरला सुरला मासेमारीचा व्यवसायही ठेकेदारांच्या घशात घालून आमची भाकरी हिरावून घेण्याचा डाव सरकार करत आहे," असा आक्रोश यावेळी मच्छीमारांनी केला. चार राज्यांनी नाकारलेला हा सौर प्रकल्प उजनीत लादल्यास पाण्याचे तापमान वाढून मासे आणि रोहित पक्ष्यांसह पर्यावरण नष्ट होईल, असा आरोप मच्छीमार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.

यासंदर्भात इंदापूर नागरी संघर्ष समितीचे संस्थापक कृष्णा ताटे म्हणाले, उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्यातील ३२ गावे, वाड्या वस्त्यांनी त्याग केला. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने शासनास दिल्या. त्याचबरोबर मुंबई ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग दुपदरीकरण व नंतर चौपदरीकरण यासाठी जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांकडे फक्त मच्छीमारी हा व्यवसाय उरला. असे असताना तो व्यवसाय देखील हिरावून घेण्याचा डाव सरकार व प्रशासनाने आखला आहे. त्यास तीव्र विरोध केला जाईल.

  उजनी व्यवस्थापन विभाग भीमानगरच्या अधिकारी सु. ऊ. डुंबरे, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी १५ दिवसात शासनस्तरावर जलसंपदा मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक पाण्यातून बाहेर आले.

  उजनी माई आमची आई आहे. हा रोजीरोटीचा प्रश्न आहे. लढाई अर्ध्यावर सोडणार नाही. विरोधात निर्णय झाल्यास आत्मदहन, पुणे सिंचन भवनावर मोर्चा, जाळी फेक आणि सडके मासे फेक असे तीव्र आंदोलन करू," असा इशारा आंदोलनकर्त्या नेत्यांनी दिला.

 यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे सीताराम नगरे, नंदकुमार नगरे, पप्पू सल्ले, दत्तात्रय व्यवहारे, संजय दरदरे, माऊली नगरे, विजय नगरे, दत्तात्रय नगरे, चंद्रकांत भोई, सौरभ सरकिले, उज्वला परदेशी, स्वप्निल भोई, विक्रम शेलार, राजकुमार वकील, श्री. गाडेकर यांच्यासह शेकडो भूमिहीन धरणग्रस्त मच्छीमार, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल भोई यांनी केले.

चौकट: इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप 

गारटकर व प्रवीण माने यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक तोडगा न काढल्यास आगामी सर्व निवडणुकीत उजनी धरणाचे विविध प्रश्न संघर्षाचे स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही, उजनीचे पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा