*इंदापूर ,डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
जेष्ठ भाजप नेते प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात इंदापूरच्या व्यंकटेश दहीहंडी संघाने सात थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. या संघास एक लाख अकरा हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी इंदापूर मध्ये प्रथमच आयोजित महिला दही हंडी सोहळ्यात मुंबई येथील विलेपार्ले स्पोर्ट क्लब च्या महिलांनी सहा मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. या संघास एक लाख एकवीस हजार रुपयांचे पारितोषीक तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. इतर सहभागी संघाना रोख अकरा हजार रुपये देऊन त्यांच्या कलेचा देखील सन्मान करण्यात आला. या नयनमनोहर सोहळ्यात तरुणाई तसेच महिलांचा एकच जल्लोष आणि दहीहंडीचा थरार पाहण्यास व अनुभवयास मिळाला. यावेळी नर्गिस पुणेकर यांचा नृत्याविष्कार तसेच बारामतीच्या रामदास जगताप व सहकाऱ्यांचा चांडाळ चौकडीने सादर केलेला मनोरंजनपर कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यामुळे कार्यक्रमाची गोडी उत्तरोत्तर वाढत गेली. यावेळी जमलेल्या गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. या कार्यक्रमास गोपाळभक्त महिला तसेच पुरुषांची अलोट उपस्थिती लाभली
इंदापूर शहरातील नूतन प्रशासकीय इमारती शेजारील पटांगणात रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने सायंकाळी दहीहंडी उत्सव २०२६ संपन्न झाला. यावेळी नृत्यांगणा नर्गिस पुणेकर हिने आपल्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकल्याने त्यांच्या नृत्याला महिलांनीही टाळ्याच्या गजरात उस्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात राजकीय आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती भविष्यातील विविध राजकीय समीकरणांची नांदी असल्याची चर्चा यावेळी रंगली. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेतील गट नेते श्रीमंत ढोले, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, नीरा भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विलास वाघमोडे, देवराज जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, नगरपरिषद विरोधी पक्ष नेते अनिल पवार व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात महात्मा फुले दहीहंडी संघ, इंद्रेश्वर दहीहंडी संघ, व्यंकटेश दहीहंडी संघ यांनी सहभाग घेतला. यामधील व्यंकटेश संघाने हंडी फोडत विजेतेपद मिळविले. दरम्यान दहीहंडी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रदीप गारटकर मित्र परिवाराचे सदस्य व कार्यकत्यांनी प्रयत्न केले.
या दहीहंडी उत्सवासाठी दोन दहीहंडी उभा करण्यात आल्या होत्या. यामध्ये एक स्वतंत्र दहीहंडी मुंबई येथील विलेपार्ले स्पोर्ट क्लब दहीहंडी संघासाठी उभी करण्यात आली. यामध्ये मुंबईवरून आलेल्या या महिलांच्या दहीहंडी पथकाने वित्तथरारक सहा मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली, यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
दहीहंडी सोहळ्यानिमित भाजप नेते प्रदीप गारटकर यांचे राजकारणा पलीकडे जाऊन विविध पक्षात राजकीय मित्र असल्याचे दिसून आले. विविध पक्षांचे नेते पक्षभेद विसरून या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झाले होते. याचा धागा पकडत प्रदीप गारटकर यांनी दहीहंडी उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमातून या उत्सवाचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, अन्यथा तो मोठा गैरसमज असेल असे सांगून नेत्यांच्या उपस्थितीवरून राजकीय मनोरे बांधणाऱ्यांना उत्तर दिले. मात्र ही आगामी विविध निवडणुकांसाठी साखरपेरणी असल्याची चर्चा रंगली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा