इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक,
सोमवार, २६ ऑक्टोबर २६
मो. ९९२२४१९१५९
कालवा सल्लागार समितीची बैठक चालू महिन्याच्या अखेरीस होत आहे. या बैठकीमध्ये भाटधर धरणातून निरा नदीमध्ये पाणी सोडावे, निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून टेल टु हेड पद्धतीने आवर्तन सोडावे, शेटफळ तलावामधून तातडीने आवर्तन चालू करावे आदी मागण्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. या मागण्यांवर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी दिली.
या मागण्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल आदींना पत्र पाठविले आहे. या पत्रावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. या बैठकीस हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे अतिशय काटेकोर नियोजन होणे आवश्यक आहे. निरा नदीकाठच्या गावांमधील नळ पाणीपुरवठा योजना नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने बंद आहेत. त्यामुळे नदीकाठच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चा-यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे भाटघर धरणातून निरा नदी पात्रामध्ये सुमारे तीन टी.एम.सी. पाणी सोडण्यात यावे, नदीवरील बंधाऱ्यांचे ३ ढापे अडविण्यात यावेत. यामुळे फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी व चा-यासाठी दिलासा मिळू शकेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून तातडीने इंदापूर तालुक्यापासून टेल टु हेड आवर्तन सोडण्यात यावे. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांमधील पिण्याच्या पाण्यास व चारा निर्मितीसाठी मदत होईल. तसेच शेटफळ हवेली ( ता. इंदापूर ) तलावात सध्या पाणी साठा उपलब्ध आहे. तलावाच्या लाभक्षेत्रातील १० गावांमध्ये गेली ५ महिन्यांपासून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेटफळ तलावातून तातडीने नागरिकांना, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी आवर्तन चालु करण्याची आग्रही मागणी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये केली आहे. या मागण्यावरती कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय निश्चितपणे होईल, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा