Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

करमाळा तालुक्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे शेतकरी वर्ग वेठीस; फुकट पगार खाण्या पेक्षा शेण बरं... मुख्यालयी बायोमेट्रिक हजेरीची मागणी — संजय (बापु) घोलप

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा तालुक्यात ग्रामीण भागातील पशुधन वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य वेळी उपचार व्हावेत, यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे वेतन देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्या ठरवून दिलेल्या मुख्यालयावर अनुपस्थित राहत असून, केवळ कागदोपत्री कारभार हाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुख्यालयी न राहता केवळ सरकारी पगार लाटणाऱ्या आणि फिल्डवर शून्य काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे न भरून येणारे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व पशुवैद्यकीय डॉक्टरांना मुख्यालयी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात हाल:

ग्रामीण भागात पशुपालन हाच शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा कणा आहे. ऐन मोक्याच्या वेळी जनावरांना अचानक आजार जडल्यास किंवा तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास, संबंधित पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यालयात किंवा शासकीय निवासस्थानी अजिबात उपलब्ध नसतात. फोन करूनही डॉक्टर प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खासगी डॉक्टरांचा खर्च न पेलवल्याने अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या मुक्या जनावरांचा डोळ्यांसमोर जीव गमवावा लागतो, ज्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे.

फक्त पगार, काम मात्र शून्य:

याविषयी संताप व्यक्त करताना मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप म्हणाले की, "हे डॉक्टर केवळ सरकारी पगार उचलण्यासाठी बसले आहेत का? प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना व जनावरांना सेवा देण्याचे काम मात्र पूर्णपणे शून्य आहे. लसीकरण, शासकीय योजनांची अंमलबजावणी किंवा पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन यातले काहीही गांभीर्याने घेतले जात नाही."

मनसे स्टाईल आंदोलनाचा सज्जड इशारा:

शासकीय सेवेत राहून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी. करमाळा तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय केंद्रांवर त्वरित बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करावी, अन्यथा मनसे स्टाईलने दणका दिला जाईल आणि तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा संजय (बापू) घोलप यांनी प्रशासनाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा