संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
'चांद्रयान-3' ही मोहीम भारताने यशस्वीपणे पार पाडली आहे. एवढंच नाही, तर या माध्यमातून भारताने कित्येक नवे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. आता प्रज्ञान रोव्हरने लँडर मॉड्यूलमधून बाहेर येऊन आपलं कामही सुरू केलं आहे. 23 ऑगस्टला सायंकाळी 6 : 04 वाजता लँडर मॉड्यूल हे चंद्रावर उतरलं. यामुळे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला. आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावर पुढील संशोधन करणार आहे. मात्र, असं असलं तरी चांद्रयान-3 समोरील आव्हानं संपलीत असं नाही.
भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. ते म्हणाले, 'विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची प्रकृती अगदी उत्तम आहे. सर्व सिस्टीम्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यापुढील आव्हानं संपली आहेत.'
चंद्रावर कोणत्याही प्रकारचं वातावरण उपलब्ध नाही, त्यामुळे अवकाशातून एखादी वस्तू चंद्राच्या या भागात कोसळली; तर ती थेट चांद्रयान-3 ला धडकू शकते. यामध्य मग एखादा अॅस्ट्रॉईड, स्पेस कचरा किंवा अन्य गोष्टींचा समावेश आहे. अशी एखादी गोष्ट चांद्रयानाच्या लँडर किंवा रोव्हरला धडकली, तर ते नष्ट होऊ शकतात' असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
चांद्रयान-3 च्या यशानंतर आता इस्रो आपल्या पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज होत आहे. आदित्य एल-1 असं या मोहिमेचं नाव आहे. आदित्य उपग्रहाला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून लाँच करण्यात येईल. त्यानंतर अंतराळातील 'एल-1' या पॉईंटवर ते डिप्लॉय करण्यात येईल. इथून आदित्य सूर्याचा अभ्यास करेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा