Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

यान चंद्रावर गेले पण पाय जमिनीवरच हवेत .ॲड. शीतल चव्हाण

 


टाइम्स 45 न्यूज मराठी नेटवर्क

                                   चंद्रावर पोहोंचण्यापर्यंतचा संघर्ष आणि या संघर्षात होरपळलेल्यांच्या स्मृती जपतच आम्हाला हा जल्लोष साजरा करावा लागेल.


एक कृष्णविवर फुटल्याने झालेल्या विश्वस्फोटातून अवकाशात सगळा पसारा विखुरला गेला. या पसाऱ्यात आपली सुर्यमाला निर्माण होते आणि त्यातल्या पृथ्वी नामक गृहावर जीवसृष्टीचा डोलारा उभा राहतो ही निसर्गातील अद्भूत घटना आहेच. पण या जीवसृष्टीतील माणूस नावाचा प्राणी विश्वस्फोटापासून ते आजवरच्या अस्तित्वाच्या प्रवासाचा धांडोळा घेवू पाहतो हे त्याहूनही जास्त आश्चर्यकारक आहे. समुद्रातल्या एका थेंबाने समुद्राच्या सफरीवर, समुद्राच्या शोधमोहीमेवर निघण्यासारखे हे अचाट आहे. 

माणसाने पृथ्वीची कक्षा ओलांडून अवकाशात प्रवेश केल्याच्या घटनेला सहा दशके ओलांडून गेली. सन १९६१ साली अंतराळात जाण्याचा पहिला मान रशियाच्या युरी गागारिनने पटकावला. त्यानंतर दोनच वर्षात रशियाच्या वेलेंतिना तेरेस्कोवाने अंतराळात प्रवेश करुन अंतराळात जाणारी पहिली महिला हा बहुमान पटकावला.

सन १९६९ साली अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंगच्या रुपाने चंद्रावर पहिले मानवी पाऊल पडले. 

आकाशातील ज्योतींचा आणि मानवी जीवनाचा संबंध जोडत ज्योतिषशास्त्राची निर्मिती करणाऱ्या भारताने मात्र अवकाशात प्रवेश केला तो थेट १९८४ साली! राकेश शर्मा या अंतराळवीराने अवकाशातून भारत कसा दिसतो या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नाला 'सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे भावनिक उत्तर दिल्याची घटना घराघरात आजही ऐकवली जाते. राकेश शर्मा हा अंतराळात प्रवेश करणारा जगातील १३८ वा माणूस आहे. माणसाने आरंभलेल्या अवकाश मोहिमेत सुनिता चावला या भारतीय अंतराळवीर महिलेचे बलिदानही महत्वाचे आहे.

काल दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे यान चंद्रावर पोहोंचले. भारताची चंद्रयान-३ मोहिम फत्ते झाल्याने सबंध भारतीयांत आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. अनेक भाषा, अनेक धर्म, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता आणि अनेक प्रकारच्या हितसंबंधांच्या परस्पर संघर्षाचा प्रदिर्घ इतिहास असलेल्या भारतासारख्या देशाने चंद्रापर्यंत मजल मारण्याचा प्रवास तसा सोप्पा नाही. भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचा जल्लोष साजरा करताना हा प्रवास समजून घ्यावा लागणार आहे. या प्रवासातील अगणित लोकांचे योगदान आणि बलिदान आठवावे लागणार आहे.

सिंधू नदीच्या सुपिक खोऱ्यात वसलेल्या मानवी वस्तीने तत्कालीन जगातील अतिशय सुरेख अशी नागरी संस्कृती निर्माण केली. या संस्कृतीच्या अवशेषांचा अभ्यास आजही मानव जातीच्या इतिहासातील महत्वाचा भाग म्हणून केला जातो. कृषीप्रधान आणि मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक असलेल्या या भूभागावर अनेक परकियांनी आक्रमणे केली. काहींनी आक्रमणे करुन या भूभागाची अपरिमित लूट केली तर काहींनी याच भूभागाला आपली भूमी मानून इथेच कायमचा मुक्काम ठोकला. अनेक नद्या मिळून महाकाय समुद्र निर्माण व्हावा तसा अनेक धर्म आणि संस्कृत्यांच्या मिलाफातून आजचा भारत देश निर्माण झाला. 

पोटापाण्याच्या आणि निवाऱ्याच्या भ्रमंतीतून विसावलेल्या माणसाने जीवनाच्या निर्मितीचे, विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यास सुरुवात केली. त्याकाळात भारताने जीवनाकडे बघण्याची आठ दर्शने (तत्वज्ञान) विकसित केली. पूर्वमीमांसा, उत्तरमिमांसा, सांख्य, न्याय, वैशेषिक, बुद्ध, जैन आणि चार्वाकांचे लोकायत असे तत्वज्ञानाचे अनेक प्रवाह या देशात निर्माण झाले. भारताला अध्यात्म्यांचा देश म्हणून ओळखले जाते पण या आठ दर्शनांतील अधिकाधिक दर्शने ही निरिश्वरवादी, विवेकवादी आणि विज्ञानवादी आहेत. जगाला अणूचा शोध आधुनिक काळात लागला पण त्याआधीच जग हे सूक्ष्म कणांपासून (पिलव) बनलेले आहे असे सांगणारा कणाद या देशात होवून गेला. 

अनेक प्रकारची विविधता, निसर्गाची संपन्नता आणि बुद्धिची कुशाग्रता असलेल्या या देशाला वर्ण-जातीच्या विषवल्लींनी सडवून मारण्याचा प्रयत्न केला. पण या विषवल्लींना उपटून टाकणारे वादळवारे बुद्ध, बसवण्णा, कबीर, मीरा, रविदास, नानक, नामदेव, ज्ञानबा, चोखा, तुकोब्बा यांच्यासारख्या महात्म्यांनी निर्माण केले. ज्ञानाला करुणेची जोड देत भारतालाच नाही तर सबंध जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शांततेचा संदेश या संतमहंतांनी दिला. 

राज्य हे राजाचे नव्हे तर रयतेचे असते अशी सैद्धांतिक आणि व्यावहारिक बैठक देवून शिवरायांनी राजेशाहीतही लोकशाहीची बीजे पेरली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक उल्ला खान यांसारख्या तरण्याबांड पोरांनी इंग्रजांपासून तर आम्ही मुक्त होवूच पण देशातील तमाम संपत्ती व संसाधनांची मालकी सबंध भारतीय समाजाची असणार आहे या समाजवादी विचारांची घोषणा देत आणि साम्राज्यवादाची कबर खोदत स्वत:च्या प्राणांची अहुती दिली. 

इंग्रजांसारख्या महाबलाढ्य शत्रूवर अहिंसा आणि सत्याग्रहाची आयुधे वापरुन मात करणाऱ्या या देशातील अर्धनंग्या फकीराला आज जगात महात्मा म्हणून ओळखले जाते. 

मनूवादी व्यवस्थेने शुद्रातिशुद्र आणि स्त्रीयांचे मानवी अधिकार नाकारलेले असताना या शोषित घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोंचवण्यासाठी आणि अविद्येने होत असलेला अनर्थ टाळण्यासाठी ज्योतिबा-सावित्रीमाई-फातिमाबी यांनी शेणफेक झेलली. क्रांतीज्योती पेटविणारे आणि गुलामगिरिवर आसूड ओढत शोषकांचे कसब हाणून पाडणारे ज्योतिबा महात्मा म्हणून ओळखले जावू लागले. 

'सर्वांस पोटास धरणे आहे' ही शिवबांची मातृहृदयी राज्यव्यवस्था टिकवत शाहूंनी शुद्रातिशुद्रांच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग आरक्षणाच्या कायद्याने प्रशस्त केला.

वर्ण-जातीच्या अनंत वेदनांची आग हृदयात ठेवत आणि आपले मस्तक देश-विदेशातील पदव्या संपादित करुन सशक्त करत लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. विज्ञानवादी दृष्टीकोण रुजवणे आणि अंधश्रद्धेला मूठमाती देणे हे संविधानाचे ध्येय आहे. ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरली आहे या पोथी-पुराणातील कल्पनेला भिरकावून देत ती तमाम कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली असल्याची घोषणा साहित्यरत्न, लोकशाहीर कॉ. आण्णाभाउ साठे यांनी केली आणि भीमरावांनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा, विवेकवादाचा घाव घालून जग बदलण्याचा संदेश मांडला. 

आज देशाचे यान चंद्रावर पोहोंचले याचा आनंद साजरा करताना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक गुलामगिरीच्या दलदलीतून चंद्रापर्यंतच्या प्रवासाचा दिर्घकालीन संघर्ष नव्या पिढीने समजून घ्यावा. या संघर्षात ज्या-ज्या महामानवांनी आपल्या जीवाचे रान केले प्रसंगी बलिदान दिले, त्यांचे योगदान स्मरावे.

क्रांतीची तलावर ही विचारांच्या सहानेवर परजली जाते' असे शहीद भगतसिंग म्हणाले होते. तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाचे यान महामानवांनी केलेल्या संघर्षाच्या आणि घालून दिलेल्या प्रेरणेच्या इंधनावर उड्डाण घेत असते, हे नव्या पिढीने ध्यानी ठेवावे.

जत्रेत बाप पोराला घेवून जातो. तुफान गर्दीमूळे आणि गर्दीत समोर उभ्या असलेल्या उंच माणसांमूळे पोराला जत्रेतले खेळ दिसत नाहीत. मग बाप पोराला खांद्यावर घेतो आणि खेळ दाखवतो. पोराला खांद्यावर घेतलेला बाप हा भूतकाळ आहे, खांद्यावर बसलेला पोरगा हा वर्तमानकाळ आहे तर पोराचे डोळे जे बघत आहेत तो भविष्यकाळ आहे. भूतकाळाचे पाय भक्कम असल्याशिवाय आपल्याला भविष्यकाळ बघता येत नाही, हे दर्शविणारे हे चित्र आहे.

आपल्या वर्तमानातील यशाचे आणि भविष्यातील आशेचे खांब इतिहासाच्या, इतिहासातील संघर्षाच्या पायावर रोवले गेले आहेत हे प्रत्येक पिढीने ध्यानात घेतले पाहिजे. 

'वसुधैव कुटुंबकम्' म्हणत विश्वालाच आपले कुटुंब मानणारी आपली संस्कृती आहे. म्हणून आपल्या देशाच्या यशाचा आनंद साजरा करताना या यशात जगातल्या सर्व भागातील माणसांनी संचित केलेल्या ज्ञानाचा आणि कार्याचाही वाटा आहे, याचेही भान आणि कृतज्ञता आम्हाला जोपासायची आहे. ज्ञानाला करुणेची आणि विज्ञानाला मानवतेची जोड देवूनच आम्हाला पुढील उड्डाने भरायची आहेत.

भारतीय यानाने चंद्रापर्यंत पोहोंचण्यासाठी अनेक झळा सोसलेल्या असणार आहेत. पण भटकणारा माणूस ते चंद्रावर निशाण फडकवणारा माणूस या प्रवासात ज्या ज्ञात, अज्ञात मानवांनी योगदान दिले त्यांचेही स्मरण आपल्याला ठेवावे लागणार आहे. ते स्मरण ठेवूनच आम्हाला आमच्या कालच्या यशाचा जल्लोष साजरा करायचा आहे आणि नव्या आशेच्या दिशेने झेपावायचेही आहे.


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो.9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा