Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

किल्लारी भूकंपाच्या आठवणीने आजही काळजात धस्स होते--- सूर्यकांत भिसे.

 


टाइम्स 45 न्युज मराठी

अकलुज .जि.सोलापूर.

                        मित्रांनो किल्लारी भुकंपाला आज ३० वर्षे पुर्ण झाली . आपल्या आयुष्यातील , आपल्या तारुण्यात , आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला हा भूकंप आठवला की खरच आजही काळजात धस्स होत . 

१९९२ च्या फेब्रुवारी - मार्च मध्ये जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रतापसिंह मोहिते पाटील तर माळशिरस पंचायत समितीच्या सभापतीपदी वेळापूरचे सूर्यकांत माने देशमुख यांची निवड झाली . माझ्या सुदैवाने माळशिरस पंचायत समितीत खाजगी सचिव ( PA ) म्हणून सूर्यकांत माने देशमुख यांनी मला घेतले . तसा प्रशासकीय कामाचा अनुभव मला नव्हता पण मराठी - इंग्रजी टायपीस्ट , शॉर्टहॅंड व पत्रकार अशी कामे मी करीत असल्याने मला घेण्यात आले . पुढे वर्षभरात सूर्यकांतदादा ( सभापती ) यांनी मला बरच काही शिकविले . त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मी उत्तम काम करु लागलो . 

याच काळात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे किल्लारी येथे भूकंप झाल्याची दुर्दैवी घटना घडली . त्यावेळी प्रसार माध्यम ( TV ) एवढी नव्हती . पण सकाळी सातच्या मराठी बातम्यांमध्ये ही घटना सर्वाना कळाली . त्यावेळी पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते . त्यांनी तातडीने मंत्रालयात बैठक घेवून लातुर जिल्ह्याला जो भूकंपाचा धक्का बसला त्याची माहिती घेतली व प्रथम त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते पाटील यांना फोन करुन किल्लारीला तातडीने मदत पुरविण्याचे आवाहन केले . लातुरला मदत करणारा जवळचा व भरवशाचा जिल्हा सोलापूर असल्याने साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून पप्पासाहेब यांनी तातडीने सोलापूरला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची मिटींग बोलावली आणि या मिटींगमध्ये किल्लारीला तातडीने मदत करण्याचे आवाहन केले . जिल्ह्यातील यंत्रणा लगेच कामाला लागली आणि माळशिरस पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत माने देशमुख यांनी दि . १ ऑक्टोबर रोजी किल्लारीला भेट देण्याचे ठरविले . तेथील परिस्थिती पाहुन मदत देवू असा निर्णय झाला . 

सायंकाळी सोलापूरहून आम्ही वेळापूरला आलो . सभापतींना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी दोन ज्वारीची पोती गाडीत ( जीप ) टाकली व ती दळून त्याच्या रात्रभर भाकरी बनवा व मोठ्या पातेल्यात बेसन करुन घ्या असा आदेश दिला . मी व आमचा ड्रायव्हर पोती घेवून वेळापूरला गावात आलो . जवंजाळ यांच्या पिठाच्या गिरणीत पोती दळायला टाकली . झोपडपट्टीवर गेलो . तेथे महिलांना गोळा केले . त्यांना घडलेली घटना सांगितली व आम्हाला भाकरी करुन द्या . तुम्हाला एक दिवसाचा पगार देतो असे म्हटल्यावर जवळपास २५ महिला तयार झाल्या . साळुंखेच्या लाकुड अड्ड्यातुन दोन मण सरपण आणले , होडगेच्या किराणा दुकानातून बेसन बनविण्यासाठी लागणारे सामान आणले . वेळापूरच्या महादेव मंदिराच्या आवारात चुली मांडल्या आणि जवळपास दहा चुलीवर रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत दोन पोत्याच्या ज्वारीच्या भाकरी करुन घेतल्या . गौरीहर गुरव ( आचारी ) यांच्याकडून बेसन ( पिटल ) करुन घेतले . सकाळी सात वाजता सभापती गाडी घेवून आले . गाडीत बेसनचे मोठे पातेले व त्यावर बॉक्समध्ये भाकरी ठेवून गाडी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली . सकाळी दहा वाजता सोलापूरात पोहोचलो . तेथून किल्लारीला जाण्याचे आदेश मिळाले आणि आमची गाडी उमरगा रस्त्याने निघाली . 



किल्लारी भुकंपानंतर तेथे लुटालूट चालु असल्याने मिल्ट्रीला बोलावण्यात आले होते . संपूर्ण परिसर मिल्ट्रीच्या ताब्यात देण्यात आला होता . आम्ही उमरग्याला पोहोचलो व मदत करण्यासाठी किल्लारीकडे वळलो पण मिल्ट्रीने आमची गाडी अडविली . गाडीची नोंद करुन पास घ्या मगच गाडी सोडली जाईल असे सांगितले . आम्ही तेथे तंबूत जावून गाडीची नोंद केली . पास घेतला व किल्लारीकडे निघालो . उमरगा ते किल्लारी सुमारे ७० - ७५ किलोमीटरचे अंतर पार करायला आम्हाला दोन तास लागले . हा रस्ता शासकीय वाहने , मिल्ट्रीने भरुन गेला होता . सर्वत्र घर दार उध्वस्त झालेली दिसत होती . जिकडे तिकडे आक्रोश सुरु होता . आम्ही माणसे पाहून मदत करायला जायचो तर कोणी मदत घेत नव्हता . दोन पोत्याच्या भाकरी व पिटल हातोहात संपेल असे आम्हाला वाटले पण सायंकाळचे पाच वाजत आले तरी एक भाकरी व चमचाभर बेसनसुध्दा कुणी घेतले नाही . त्यावेळी नुकताच जेसीपी आला होता . जेसीपीचा ड्रायव्हर ढिगारे खोदत होता . त्याखाली अडकलेली व मृत्युमुखी पडलेली माणसे बाजुला काढत होता . जवळच ट्रॅक्टर ट्रॉली उभी केली होती . त्या ट्रॉलीत ते मृतदेह टाकत होता . अत्यंत भयानक दृष्य आम्ही पहात होतो . ते पाहून आमचीही तहानभूक हरवून गेली होती . कोण कोणत्या जातीचा , धर्माचा माहिती नव्हते . ट्रॉलीत घातलेले मृतदेह जवळच घेतलेल्या मोठ्या खड्ड्यात टाकले जात होते व जेसीपीने तो खड्डा झाकला जात होता . माणूस मेल्यावर खांद्याला चार नातेवाईक लागतात , शिकाळ धरायला मुलगा लागतो अन पाठीमागे वारा घालायला मुलगी लागते हे स्मशानभूमीत मयतीला गेल्यावर पाहिले होते . येथे ना नातेवाईक , ना मुलगा , ना मुलगी ना रडण्यासाठी कोणी शिल्लक राहिले होते . ढिगारा उचलावा , त्यात आलेली माती ट्रॉलीमध्ये डंप करावी व ती दूर नेवून टाकावी तसे हे मृतदेह उचलले जात होते . हे सार पाहून मन खिन्न झाल . 



सायंकाळी ५ वाजता सभापती म्हणाले , भिसे आता या बेसन भाकरीचे काय करायचे ? मी म्हणालो , दादा जेथे मदत कार्य करणारी मिल्ट्रीचे लोक आहेत त्यांना देवु असे म्हणून आम्ही किल्लारी - लोहारा रस्त्यावर उभा केलेल्या मिल्ट्रीच्या तंबूकडे गेलो . तेथे अधिकाऱ्यांना भेटलो व बेसन भाकरी त्यांना दिली आणि आम्ही सोलापूरकडे मार्गस्थ झालो . 



रात्रो आठ वाजता सोलापूर - पुणे रस्त्यावरील आ दिलीप माने यांच्या हॉटेलवर गेलो . स्वच्छ तोंडहातपाय धुतले . दादा म्हणाले , भिसे जेवणार काय ? कारण आम्ही सकाळपासून अन्नाचा एक कण सुध्दा खाल्ला नव्हता व पाणीही प्यायलो नव्हतो . डोळ्यासमोर नुसते मृतदेहाचे ढिगारे दिसत होते . मी मानेनेच नकार दिला . मन सुन्न झाले होते . फक्त एक एक ग्लास पाणी पिउन आम्ही वेळापूरला आलो . दादांना व मला घरी सोडून ड्रायव्हर माळशिरसला गेला . त्या दिवशी रात्री झोपही लागली नाही . मृत्यू म्हणजे काय असतो तो आज डोळ्याने पाहिला होता . तेंव्हापासून ठरविले आयुष्यात कोणाशी वैर करायचे नाही , कुणाला कमी लेखायचे नाही , शक्य तेवढी मदत करायची , भुकेलेल्यांना अन्नदान व प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करायचा . जात , धर्म , पंथ हे सर्व झुट आहे . मृत्यू हा अटळ आहे . माणुसकी हाच मोठा धर्म आहे आणि आयुष्यभर तो जपायचा . 

आज किल्लारी भुकंपाला ३० वर्षे पूर्ण झाली . तो भुकंप आठवला व आठवणी जागृत झाल्या . 


सूर्यकांत भिसे 

9822023564















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा