निवडणूक रणनितीकार
टाईम्स 45 न्युज
- बावडा ग्रुप ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी तीन तर सदस्यांच्या सतरा जागेसाठी ५६ उमेदवार रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत. मुख्य लढत ही सत्ताधारी काळेश्वर ग्रामविकास पॅनल विरूद्ध पद्मावती ग्रामविकास परीवर्तन पॅनल यांच्यात चुरशीने होणार आहे. जनतेतून सरपंच निवडीची पहिलीच निवडणूक असल्याने बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतची मागील निवडणुक बिनविरोध करण्यात आली होती. त्यावेळी अनेक इच्छुकांचे अर्ज माघारीसाठी भले झाले होते. त्यामुळे यावेळच्याही निवडणुकीत मागील वेळे प्रमाणे फायदा होईल या आशेपोटी अनेक इच्छुकां बरोबर अपक्षांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले होते. परंतू निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक लागल्याने अनेक इच्छुकांचा व अपक्षांचा अपेक्षा भ़ंग झाला आहे. पण अनेक वार्डातील उमेदवारांची गणीते बिघडवण्याचे काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्ताधारी काळेश्वर ग्रामविकास पॅनलची मदार मागे केलेली कामे व पुढे करणार असलेली कामे याबाबतच मतदारांमध्ये जाऊन मत मागितले जात आहे. तर विरोधी पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या वतीने परंपरेने सत्ता भोगूनही नागरिकांच्या मूलभूत अपेक्षा व आकांक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याचे सांगत एक वेळेस आम्हाला सत्ता द्या आम्ही यामध्ये परिवर्तन घडवून आणू असे मतदारांना सांगितले जात आहे. तर सत्ताधारी व विरोधकांना ग्रामपंचायतचा विकास करता आला नाही. त्यामुळे आम्हाला एक वेळ निवडून द्या आम्ही विकास घडवून दाखवतो असे अपक्षांच्या वतीने मतदारांना सांगितले जात आहे.
जनतेतून सरपंच पदासाठीची निवडणूक होत असल्याने सत्ताधारी व विरोधक उमेदवाराला मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होताना पाहायला मिळत आहे. सरपंच पद हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने रिंगणामध्ये तीन उमेदवार राहिले आहेत. सत्ताधारी पक्षाकडून माळी समाजातील सौ. पल्लवी रणजीत गिरमे तर विरोधकांकडून मुस्लिम समाजातील फरजाना साजिद मुलाणी व माळी समाजातील अपक्ष लक्ष्मी लहु कुर्डे रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील सदस्यांना सरपंच पदासाठीही मते मागावी लागत असून सर्वांचीच मोठी कसरत सुरू आहे. सरपंच पदाची माळ मतदार कोणाच्या गळ्यात घालणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत गावकी, भावकी, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक यांचे रुसवे, फुगवे काढण्यासाठी उमेदवारांना रात्र जागून काढावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. यामध्ये पारंपारिक मतदाराबरोबर जवळचा, लांबचा, लहानशा गोष्टीतून रागावलेला, रुसलेला मतदाराला विनवण्यास वेळ घालवावा लागत आहे. यासाठी साम-दाम-दंड-भेद जेवणावळ पार्ट्या देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. तर काहींना आर्थिक लालसा दाखवून आपलेसे केले जात आहे. जस जसा वेळ निघून चालला आहे तस तसा रंग भरू लागला आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा