अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी एक इंच ही मागे हटणार नाही, व मराठा बांधवांनीही अगदी उद्यापासून गाव,तालुका, जिल्ह्यातील एकही मराठ्यांचे घर न सोडता त्यांना आरक्षणाचे महत्व पटवून द्यावे व कोणतीही जाळपोळसारखे उग्र आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून शासनाच्या छाताडावर बसून आरक्षण घ्यायचे असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृतीसाठी शनिवार दि.२१ रोजी अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर जरांगे-पाटील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिंगणापूर, ता.माण येथील सभा आटोपून जरांगे-पाटील दुपारी साडेबारा वाजता अकलूज येथील क्रीडा संकुलावर पोहोचले. दरम्यानच्या काळात शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवड्याचा कार्यक्रम ठेवला होता. संकुलावर त्यांना हालग्यांच्या कडकडात मंचावर आणले.त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मुले उभारली होती.मात्र त्यांनी पुष्पवृष्टी करण्यास नकार दिला.
आरक्षणासाठी जालन्याच्या तरुणाने मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंचावर सत्कार स्वीकारण्यासही नकार दिला. व मंचावरील जिजाऊ,छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनानंतर थेट भाषणाला सुरुवात केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,या राज्यात सातत्याने मराठेच सत्तेत असूनही मराठा समाजावर नेहमीच अन्याय होत गेला आहे. त्याचे परिणाम आता आमच्या मुलाबाळांना भोगावे लागत आहेत, आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलाला शिकवायचे, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलानेही कष्ट घ्यायचे व नेमके नोकरी लागण्याच्या वेळी या आरक्षणाची अडचण येते. त्यामुळे आता हा मराठा समाज ही खदखद व वेदना घेऊन बाहेर पडला आहे. त्यास रोकणे आता कोणत्याही सरकारला सोपे राहिले नाही. त्याची सुरुवात २९ ऑगस्ट पासून झाली आहे. आता आरक्षणाच्या विरोधात बोलायचे ही नाही. हा मराठ्यांच्या आरक्षणाचा पहिला व शेवटचा लढा असणार आहे, त्यामुळे समाजातील बांधवांनी कोणाचे राजकारण, आपसातील मतभेद बाजूला ठेऊन या लढ्यात सामील झाले पाहिजे. मी तुमच्याबरोबर आहे, मी मरेपर्यंत व आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. मराठा समाज ही गद्दारांची पैदास नाही. आपण शासनाच्या छाताडावर बसून आरक्षण मिळवू परंतू त्यासाठी कोणी आत्महत्या सारखा मार्ग पत्करू नका.
मला उपोषणावेळी येऊन बोलण्यासाठी कोपऱ्यात चला म्हणत होते पण मी जे काही बोलायचे ते समाजासमोर बोला अशी भूमिका घेतल्याने ते अडचणीत आले, त्यांनी माझी समजूत काढण्यासाठी सन २००४ सालाचा जी आर दुरुस्त केल्याचे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा