टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या बद्दल प्राथमिक माहिती आपल्या सर्वांनाच आहे. परंतु पहिली मुलींची शाळा सुरु करण्याच्या पलीकडे त्यांचे अनेक क्रांतिकार्य आहेत ते ही आपण समजून घेतले पाहिजेत.
1882 ला हंटर कमिशन समोर साक्ष देताना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे मिळावे ही मागणी करणारे आशिया खंडातले पहिले व्यक्ती म्हणून महात्मा फुलेंकडे पाहिले जाते.
1883 साली शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांचा असूड नावाचं पुस्तक लिहून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कोणामुळे झाली हे जाहीर पणे सांगणारे पहिले समाजसुधारक म्हणून महात्मा फुलेंना ओळखले जाते.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री पुरुष समानता हा त्यांच्या वैचारिक लढाई मधला सर्वात महत्वाचा भाग होय. मूल बाळ न होण्यामागे केवळ स्त्रीच जबाबदार नसते हे त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले होते यावरून त्यांचा दृष्टीकोन किती मोठा होता हे लक्षात येते.
1869 मध्ये स्वतः च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून अस्पृश्यता निवारणाचं काम त्यांनी हाती घेतलं होतं.एवढंच नव्हे तर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुद्धा काढल्या होत्या,अस्पृश्य जातीतील शिक्षक निर्माण करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होतं.
1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून बालहत्या रोखण्याचं काम त्यांनी केलं होतं.
विधवा महिलांचे होणारे केशव पण थांबवलं जावं म्हणून त्यांनी नाभिक समाजाचं प्रबोधन करून केशवपणा विरोधात संप घडवून आणला होता. जो भारतातील पहिला संप म्हणून ओळखला जातो.
1876 -82 या काळात पुणे महानगर पालिकेचे सदस्य असताना इंग्रज गव्हर्नरांच्या भारत भेटीदरम्यान केली जाणारी पैश्याची उधळपट्टी थांबवून तोच पैसा शाळा काढण्यासाठी खर्च करावा ही मागणी करणारे महात्मा फुले हे एकमेव व्यक्ती होते.
1855 साली तृतीय रत्न नाटक लिहून बहुजन समाजाची कशी फसवणूक केली जाते हे त्यांनी नाटकातुन मांडलं आहे. हेच नाटक भारतातलं पहिलं नाटकं म्हणून ओळखलं जातं.
तुकाराम तात्या पडवळ यांनी वज्रसूची या बौध्द साहित्याचा जातीभेद विवेकसार म्हणून मराठीत अनुवाद केला होता ते प्रकाशित करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं होतं. किंबहुना बौध्द साहित्याचे पहिले प्रकाशक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते.
1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावून पहिली शिवजयंती साजरी करणारे पहिले व्यक्ती म्हणून महात्मा फुलेंची दखल घेतली जाते एवढंच नव्हे तर शिवरायांवरती पहिला पोवाडा लिहिणारे सुद्धा महात्मा फुलेच आहेत हे ही लक्षात घेतलं पाहिजे.
24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार प्रसार केला.सत्यशोधक जलसे, नाटकं, पोवाडे या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं.
तृतीयरत्न नाटकं, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी नावाचे ग्रंथ लिहिले.
11 में 1888 मध्ये मुंबई येथील जनतेने सभा घेऊन त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली, जनतेच्या द्वारे महात्मा ही पदवी दिली गेलेले महात्मा फुले हे एकमेव व्यक्ती आहेत.
पुणा कमरशियल अँड कॉन्टॅक्टींग नावाची कंपनी स्थापन करून अनेक दर्जेदार बांधकाम करण्याचं त्यांनी काम केलं आहे. त्या मध्ये येरवडा पूल असेल बनगार्डनचा पूल असेल व्ही. टी. स्टेशन असेल, बडोद्याचा महाराज सयाजीराव गायकवाड यांचा राजवाडा असेल असे अनेक कामं महात्मा फुलेंच्या या कंपनीने केलेले आहेत.
सोने बनवण्यासाठी लागत असलेल्या मुशिंची मुंबई प्रांतातील होलसेल एजन्सी त्या काळी केवळ महात्मा फुलेंकडे होती.
महात्मा फुले हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहा व्यक्ती मध्ये होते, त्यावेळेस टाटाचं वार्षिक उत्पन्न 20 हजार होतं तर महात्मा फुलेंचं 21 हजार होतं.
परंतु श्रीमंती धन पैसा या भानगडीत न पडता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्व संपत्तीचा त्याग केला.
28 नोव्हेंबर 1890 ला अर्धांग वायुच्या आजारा मुळे त्यांचा मृत्यू झाला आणि ते आपल्याला सोडून गेले.अश्या या महामानवाच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
सतिश कचरे
कृषी मंडळाधिकारी,नातेपूते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा