*टाइम्स 45 न्युज मराठी*
फडणवीसांचे देशाच्या नावाखाली अजित पवारांना सार्वजनिक पत्र म्हणजे 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.'
दोन महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? याबाबत झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदारांची यादी सादर करण्यात आली. त्यामध्ये ४२ वे आमदार देशद्रोहाचा आरोप असलेले आमदार नवाब मलिक आहेत.
आता सदर बाब राज्याच्या गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना दोन महिने झाले तरी ठाऊक नव्हती का? तर फडणवीसांना नवाब मलिक यांच्या बद्दल माहिती होती. शिवाय नवाब मलिकांना वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळालेला नसून मलिकांचा जामीन हा राजकीय स्वरुपाचा आहे. हे संपूर्ण राज्याला ठाऊक आहे.
काल मलिक अधिवेशनात सत्ताधारी अजित पवार गटासोबत बसले, आणि सोशल मेडीयावर टिकेची राळ उडाली. त्यावेळेस फडणवीस विधान परिषदेच्या सभागृहात होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्यावरील भाजपाचे आरोप आणि आताची सत्तेत घेतल्यावरची भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर द्यायला सरकारतर्फे देवेंद्र फडणवीस उठले. फडणवीसांनी आत्ताची सरकारची भूमिका यावर उत्तर देण्याऐवजी, 'मविआ सरकारने नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही? याचे आधी उत्तर द्या. मग आम्ही उत्तर देऊ.' अशी असंसदीय, अनैतिक शेरेबाजी केली. पूर्वी असा प्रकार फक्त तमाशात कलगीतुरा नावाने बघायला मिळायचा.
मात्र मलिक सत्तेत सहभागी असल्याचे जनतेला समजल्यानंतर दुपारपर्यंत सोशल मेडीयावर महाराष्ट्र भाजपची अब्रू खुडूक कोंबडी तुळीला टांगावी, अशी टांगली गेली. सोशल मेडीयातून टिकेची राळ उडाली. तसे पुरते बेअब्रू होवूनही केवळ मेडीया मॅनेजमेंट आणि दुष्काळावरुन लक्ष हटवून व्हाटअबाउट्री करण्यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून सार्वजनिक केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असा उत्तर पेशवाईतला नंगानाच सुरु आहे.
-एक महाराष्ट्रवादी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा