Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

*राणादादा - तुम्ही नेमका कोणता इतिहास प्रस्थापित करत आहात* *ॲड--शीतल चव्हाण* *मो --9921 657 346*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

              तुळजापूरचे आमदार मा. रणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. तुळजापूर भागातून जात असलेल्या महामार्गावर आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचा १०८ फुटी उंच व २५० कोटी खर्चाचा पुतळा उभा करणार असल्याबाबतची ही घोषणा होती. 

आई तुळजाभवानी ही स्त्री सत्तेचे प्रतिक असलेली स्त्रीसत्ताक मातृ कुटुंब पद्धतीतील आदर्श गणनायिका आहे. आजही लोकांच्या मनात आई तुळजाभवानीबद्दल नितांत श्रद्धा आहे. तद्वतच जूलमी सत्तांविरोधात निकराचा लढा देवून प्रजेचे, शेतकऱ्यांचे स्वराज्य उभे करणाऱ्या शिवरायांबद्दलही तमाम जनतेच्या मनात नितांत आदरभाव आहे. परंतू, आई तुळजाभवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली, ही घटनाच मुळात काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. 

स्मृतिशेष कॉ. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या "शिवाजी कोण होता?" या छोटेखानी पुस्तकात छत्रपती शिवराय अन् भवानी तलवार याच्याशी संबंधित एक उताराच लिहिलेला आहे. तो जशास तसा खाली देत आहे,


"शिवाजी व भवानी तलवार:

भोळ्याभाबड्या शिवभक्त रयतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्येसुद्धा शिवाजीच्या यशाचं एक कारण पुन:पुन्हा सांगून रुजवलं गेलंय. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न झाली होती. म्हणून शिवाजी यशस्वी झाला.

महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीची ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून 'जय शिवाजी जय भवानी' असा गजर उठवत आहेत.

शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती, हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते. पोर्तुगिजांबरोबर गोव्यात ही तलवार आली. तिथून ती सांवताकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे. या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही. साताऱ्यात एक म्युझिअम आहे. त्यात एक तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते. तीच भवानी तलवार आहे की नाही यासंबंधी वाद आहे. परंतु साताऱ्याच्या म्युझिअममधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत. आजही ती कुणासही पाहता येतील.

लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करुन लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजू देण्यास तयार नसतात. सारखे सारखे सकाळ-संध्याकाळ 'जय शिवाजी जय भवानी' म्हटल्याने शिवाजी समजत नाही. भवानीमाता कळत नाही."


यावरुन हे स्पष्ट होते की छत्रपती शिवराय यांचे समतामूलक, ऐतिहासिक कार्य आणि भवानी तलवार यांचा अर्थाअर्थी कसलाही संबंध नाही. 

छत्रपती शिवरायांच्या मनात आई तुळजाभवानीबद्दल नितांत श्रद्धा असेल, ती त्यांनी अनेकवेळा व्यक्तही केलेली असेल. पण त्या श्रद्धेला अंधश्रद्धेचे व काल्पनिकतेचे वळण देत आईतुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली म्हणून स्वराज्याची क्रांती होवू शकली अशा पद्धतीने इतिहास रंगवून शिवरायांच्या व मावळ्यांच्या कर्तृत्वाला झाकण्याचा, दुर्लक्षित करण्याचा किंवा दैवी शक्तीच्या नावाखाली मानवी प्रयत्नांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेवून आताच्या लोकांनी व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध बंड करु नये, कारण त्यांना शिवरायांसारखा दैवी संकेत नाही, असेही भासवून व्यवस्थितेतील असंतोष शमवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या इतिहासाच्या अवास्तविक चित्रणातून केला जातो. 

म्हणून मोठ्या अभिमानाने या पुतळ्याच्या स्थापनेचा निर्णय जाहीर करणाऱ्या राणादादांना आम्ही हा सवाल करतो, की दादा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा इतिहास प्रस्थापित करायचा आहे? कल्पनेवर आधारित की वास्तवावर, मूल्यांवर आधारित असलेला? शिवरायांच्या आयुष्यात अशा अनेक वास्तविक घटना आहेत ज्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सतत प्रेरणा देत राहतात. त्या घटना व प्रसंग टाळून ही काल्पनिक घटनाच पुतळ्यासाठी का निवडली? येणाऱ्या पिढ्यांनी रक्त सांडून रयतेच्या स्वराज्याच्या स्थापनेची प्रेरणा घ्यावी की दैवी संकेताची वाट पहावी? आपल्याला अगर आपण ज्या संघ-भाजप परिवारात अलिकडे दाखल झाला आहात त्यांना नेमका कोणता इतिहास प्रस्थापित करायचा आहे? महाराष्ट्राच्या मातीत झालेल्या स्वराज्याच्या क्रांतीचा की पंतोजींच्या डोक्यातून निघालेल्या कल्पनांचा? 

आपण कितीही चंग बांधला तरी आई तुळजाभवानीवर श्रद्धा असलेली अन् शिवरायांच्या खऱ्या इतिहासातून प्रेरणा घेवून तयार झालेली जनता आपले मनसूबे खरे ठरु देणार नाही हे निश्चित!


*ॲड. शीतल शामराव चव्हाण*

*' (मो.9921657346)*


*(दि.०६ डिसेंबर, २०२२ रोजी लिहिलेली पोस्ट आज पुन्हा शेअर करीत आहे. राणादादा, राणादादा समर्थक, संघ-भाजप समर्थक यांनी आता तरी याचे उत्तर द्यावे.)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा