शकुरभाई तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण ,सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले सर्व बालचमू.....
"अशी करारी नजर, सदा गनिमा भेदूने पाही आरपार ,शिवरायांमुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार"
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर ,प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी महर्षि संकुलात अखंड महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत सरुडकर व प्रशाला सभापती नितीनराव खराडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी छत्रपती शिवराय म्हणजे राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होते असे सांगितले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व प्रमुख मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला. छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर रुद्रा घाडगे, माही बागल, कीर्ती साठे, वर्धमान मालगत्ते यांनी शहारे आणणारा इतिहास शब्दरूपाने डोळ्यांसमोर उभा केला. उत्कर्षा तोरसे व सहकारी विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या पोवाड्याचे अप्रतिम सादरीकरण केले.
शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून संकुलात विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रशांत सरूडकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, छत्रपती शिवराय म्हणजे कित्येक वर्षापासून अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचेच किरण होय .रायरेश्वराची शपथ, स्वराज्यासाठी घेतलेल्या मोहिमा ,त्यांच्या ठाई असणाऱ्या अष्टावधानी ,स्त्रियांचा आदर, स्वराज्याची निष्ठा, शस्त्रास्त्र निपुण सर्वधर्मसमभाव या गुणांची ओळख वेगवेगळ्या प्रसंगातून करून दिली. संकुलातील सहशिक्षक महेश शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित दैवत आमचे छत्रपती हे गीत गायन केले.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, अनिल जाधव ,विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे,सविता गायकवाड, शिवाजी थोरात, नामदेव कुंभार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश माने यांनी केले तर आभार किरण सूर्यवंशी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा