*विशेष----प्रतिनिधी*
*राजु (कासिम)मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.-84088 17333
(१) भरपूर मित्र, मैत्रीणी बनवाव्यात. भरपूर सफर करावी. हरेक नमुन्याच्या माणसांत मिसळावं. माणसं वाचावीत, समजून घ्यावीत. माणसांची सुख, दु:ख, आनंद, वेदना, भावना, लहरीपणा, स्वार्थ, राग, लोभ, मत्सर, गरज असे सगळे काही नीट समजून घ्यावे.
(२) चोखंदळ वाचन करावे. किमान दोन, तीन भाषांतील विविध साहित्यप्रकार वाचावेत. वाचून त्यावर मनन, चिंतन करावे. पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकाबद्दल आपल्याला काय वाटले हे स्वैरपणे लिहून ठेवावे. आपली मतं बनवावीत. ती वस्तुस्थितीशी, सभोवतालच्या परिस्थितीतीशी कितपत मिळतीजुळती आहेत, हे देखील तपासावे.
(३) कुणाचाही कायमचा प्रशंसक किंवा कायमचा निंदक होवू नये. चिकित्सा करावी. सत्य मांडावे. चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट म्हणावे. आपण ज्या वर्गात जगतो, त्या वर्गाची बाजू सातत्याने मांडावी. आपण ज्या वर्गात जगतो, त्या वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी पक्षपाती होणे व्यवहार्य असते. जगायचे गरीब, सर्वसाधारण वर्गात आणि वर्तणूक मात्र श्रीमंत, धनदांडग्या वर्गाचे हितसंबंध सांभाळणाऱ्या विचारास, कृतीस समर्थन देणारी करायची असा उलटा, अव्यवहार्य प्रकार करु नये.
(४) गाणी, कविता, चित्रकला, स्थापत्यकला, नेपथ्यकला, अभिनय, वक्तृत्व, लेखन, साहित्य, संगीत अशा विविध कलागुणांचे रसग्रहण करावे. कलासक्त व्हावे.
(५) मैदानी खेळ खेळावेत. व्यायाम करावा. शेतातील व घरातील अंगमेहनतीची कामे करावीत. किराणा भरणे, भाजीपाला आणणे, घरातील वस्तूंची खरेदी करणे अशी कामे स्वत: करावीत. यातून उत्पन्न आणि खर्च यांचा अंदाज येतो, व्यवहार कळू लागतो.
(६) जगातील सर्व धर्म, प्रार्थना पद्धती, चालीरीती समजून घ्याव्यात. त्यातले चांगले, वाईट, कालसुसंगत काय, कालबाह्य काय हे समजून घ्यावे.
(७) विज्ञानाच्या विविध संकल्पना, विविध शोध, वैज्ञानिकांची माहिती, निसर्ग, विश्वाची उत्पत्ती आणि विकास, भूगोल, खगोल, नैसर्गिक घटना इत्यादी नीट समजून घ्यावे.
(८) सण, उत्सव समजून घ्यावेत. ते साजरे करावेत. त्यात कालानुरूप नवनवी भर घालावी.
(९) समाजकारण, राजकारण समजून घ्यावे. सामाजिक बदलाची प्रक्रिया समजून घ्यावी. हुर्रेबाजी, टवाळखोरी करु नये. नेत्यांकडे माणूस म्हणून बघावे. कुणालाही टायगर, ढाण्या वाघ, मालक, डॉन, बॉस अशा अवास्तव उपाध्या देवून डोक्यावर मिरवू नये. व्यक्तीस्तोम माजवू नये. श्रीमंतांचे उदात्तीकरण आणि सर्वसामान्यांचे खच्चीकरण करणाऱ्या व्यवस्थेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे हातभार लावू नये. चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला न जमल्यास किमान त्यांचे समर्थन करु नये. चांगल्या गोष्टींचे समर्थन करायला न जमल्यास किमान त्यांना विरोध करु नये.
(१०) मौजमजा करावी. मित्रांसोबत पार्ट्या कराव्यात. जीवनातील सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा. पण कशाच्याही आहारी जावू नये. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा नाश ओढावेल असे कुठलेही कृत्य करु नये. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नये. कशापासूनही पूर्णत: अलिप्त राहणे किंवा कशाच्याही पूर्णपणे आहारी जाणे असे टोकाचे वर्तन करु नये. संतुलित जीवन जगण्याची सवय लावून घ्यावी.
(११) जे जे आपल्याला कळाले, ते इतरांना सांगावे. सचोटीने पैसा कमवावा. कमावलेल्या पैशांतून घरप्रपंच सांभाळून थोडासा समाजकार्यासाठी विनियोग करावा. जनसामान्याचे प्रबोधन करावे. वाचनास, उद्यमशीलतेस प्रोत्साहन द्यावे. सर्वसामान्य कुटुंबातील स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्यांचा आदर बाळगावा.
(१२) नागरी समस्यांवर बोलावे, लिहावे, व्यक्त व्हावे. सामाजिक, राजकीय विषयांवर परखडपणे व्यक्त व्हावे. कुणाचेही मिंदे न होता स्वाभिमानाने जगावे. कुणाचा गुलाम होवू नये, कुणाला आपला गुलाम बनवू नये. प्रामाणिकपणे मतदान करावे. कुणाचा अवास्तव, अतिरेकी गौरव करु नये. कुणाचा अवास्तव, अतिरेकी तिटकारा करु नये. विचारांशी एकनिष्ठ राहून आपले मत परखडपणे मांडावे. पण कुणाचाही व्यक्तिगत द्वेष करु नये.
(१३) आईवडलांचा आदर करावा. त्यांचा सांभाळ करावा. त्यांच्या पटत नसलेल्या गोष्टी नाकारताना त्या नाकारण्याची कारणे व्यवस्थित समजावून सांगून नाकाराव्यात. काही लहानसहान गोष्टी आपल्याला आवडत नसतानाही त्यांच्या समाधानासाठी करणे भाग पडत असल्यास त्या जरुर कराव्यात.
(१४) स्वत:च्या व इतरांच्या जीवनावर नितांत प्रेम करावे. जगावे, जगू द्यावे. आपल्यापेक्षा कमजोरांना अभय द्यावे. उदांडांना दम द्यावा. पश्चात्ताप झालेल्यांना माफ करावे. चुका करुनही उन्मत्तपणे वागणाऱ्यांची गय करु नये.
(१५) नेहमी स्वत:शी स्पर्धा करावी. आपण काल जे होतो त्यापेक्षा उत्तम होण्यासाठी धडपडावे. इतरांशी तुलना करुन अकारण त्रास करुन घेवू नये.
(१६) कुटुंब, नातेवाईक यांच्यात मिसळावे. सुखा-दु:खात सामील व्हावे. लहानांसोबत लहान होवून जावे. आपल्यापेक्षा लहानांकडूनही बरेच शिकायला मिळते. ते शिकत रहावे.
(१७) स्वत:वर कुटुंबावर, समजावर, देशावर, अखंड मानवतेवर नितांत प्रेम करावे. जीवन सुंदर आहे, ते अधिकाधिक सुंदर बनवावे.
(१८) मित्र कोण, शत्रू होण ओळखावे. मित्रांना जोडावे. शत्रूपासून सावध रहावे. अतिभोळेपणाने आपण लुबाडले जातो. अतिचातुर्याने इतरांची फसवणूक करु पाहतो. म्हणून भोळेपणात फसणार नाही आणि अतिचातुर्य करुन इतरांची फसवणूक करणार नाही, याची काळजी घ्यावी.
(१९) न्यायाने, समतेने, मैत्रीभावाने जगावे. कुणालाही कमी लेखू नये. कुणालाही वास्तवापेक्षा जास्त मोठा मानू नये.
(२०) मृत्यू अटळ आहे. पण म्हणून जीवन क्षुल्लक किंवा कवडीमोल नाही. आपल्या प्रयत्नाने, आपल्याला मिळालेल्या साधनांचा आणि संधींचा पुरेपूर उपयोग करुन आपल्या जीवनाला महान बनवण्याचा प्रयत्न आपण शेवटच्या श्वासापर्यंत केला पाहिजे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा