*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार ---लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातील बीएससी कृषी शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर इंझा झाडेन या कंपनीची बारटोक या जातीची भरीताच्या वांग्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. आंब्यांच्या बागेतील प्रक्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून वांगी पीकाची लागवड केली आहे सदर वांगी पिकाची लागवड एक जानेवारी २०२४ रोजी रोपे लावून करण्यात आली.
महाविद्यालयातील प्रक्षेत्रामध्ये आंबा या पिकाची लागवड सघन पद्धतीने १४ बाय ४ फुट या पद्धतीने दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेली होती . शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंतर पिकाची लागवड करून मुख्य पीक चालू होण्यापूर्वी कमी दिवसात उत्पादन देणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करावी अशा सूचना व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना दिल्यानंतर या ठिकाणी बारटोक वांग्याची लागवड करण्यात आली.दोन वांग्याच्या रोपांमध्ये तीन फूट अंतर ठेवून मल्चिंग पेपर वरती ३२५० रोपांची लागवड करण्यात आली.यापूर्वी बेडवरती बेसल डोस म्हणून कंपोस्ट खत,निंबोळी पेंड व रासायनिक खते कृषी विद्यापीठ शिफारसीनुसार देण्यात आली आहेत.सदर वांग्याची तोडणी ५५ दिवसात चालू होऊन सध्या वांग्याचे चार तोडे करण्यात आले आहेत. ५५ व्या दिवशी पहिला तोडा केल्यावर १००० किलो, ५९ व्या दिवशी १२०० किलो, ६३ व्या दिवशी १५०० किलो आणि ६७ व्या दिवशी १२०० किलो उत्पादन निघून सरासरी १८ ते २५ रू दर मिळाला आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति झाड १२ ते १६ किलोपर्यंत उत्पादन मिळते अशी कंपनीची शिफारस आहे व हा प्लॉट साधारणता पुढील चार महिने चालू राहणार असून आठवड्याला दोन तोडे एक ते दीड टनापर्यंत उत्पादन मिळेल. सदर वांगी पिकास भाजीपाला मॉड्युलचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी प्लॉटची निगा चांगल्या पद्धतीने घेत असल्यामुळे सदर वांगी पिकाचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे.वेळोवेळी कीड व रोगांचे नियंत्रण तसेच ड्रिपमधून विद्राव्य खतांचा वापर करण्यात येतो.
या पिकाची बाजारपेठ प्रामुख्याने मुंबई व पुणे ही असून सदर वांग्यास साधारणपणे १८ ते २५ रुपये मालाच्या गुणवत्तेनुसार दर मिळत आहेत.सदर प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना वेळोवेळी उद्यान विद्या विभागतील प्राध्यापक मॉड्युलचे समन्वयक डॉ.शैलेंद्र माने,प्रा.सचिन भोसले,प्रा.शितल मस्कर व कृषी सहाय्यक नितीन भोसले यांचे सखोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांनी ऐवढा चांगला प्लॉट प्रात्यक्षिकावर आधारित तयार केल्यामुळे कृषी महाविद्यालयाच्या वतीने स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती व सर्व सदस्य तसेच "प्राचार्य आर.जी.नलवडे"यांच्याकडून "आठव्या सत्रातील भाजीपाला मॉड्युल "मधील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील ,संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील या सर्वांकडून विद्यार्थ्यांचे संबंधित प्राध्यापकांचे कौतुक होत आहे व त्यांच्या पुढील कार्यानुभव आधारित शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
*चौकट*
महाराष्ट्रात विविध भागात आवडीनुसार वांग्याची लागवड केली जाते.दररोजच्या आहारात वांग्याची भाजी,भरीत,मसाल्याने भरलेली वांगी,दही वांगी पण बनवली जातात.
*खानदेशामधे भरिताची वांगी फेमस आहेत.विदर्भात कमी काटेरी वांगी तर सोलापूर,पुणे, मराठवाड्यामध्ये काटेरी वांगी जास्त खातात.
वांगी पिकांची लागवड करताना सुधारित व संकरित जातींची निवड कारणे, रोपवाटिका नियोजन,लागवड कधी करावी. लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, आणि कीड व रोग नियंत्रण या बाबी खुप महत्वाच्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा