*श्रीपूर---बी.टी.शिवशरण
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊस बिलाची व तोडणी वाहतूक बिलाची रक्कम बँकेत जमा केली असून या हंगामात स्वर्गीय मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांनी घालुन दिलेल्या तत्वानुसार प्रथमता शेतकरी हा नियम पाळुन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रति मे. टन रक्कम रु. 2800/- प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, गळीत हंगाम 2023-24 मध्ये ऊसाची कमतरता जाणवेल असा सुरुवातीस संपुर्ण महाराष्ट्राचा अंदाज होता. परंतु योग्य वेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एकरी टनेजमध्ये वाढ होवून कारखान्यास या हंगामात 10 लाख 71 हजार 100 मे.टन ऊसाचे गाळप करणे शक्य झाले. त्याचप्रमाणे कारखान्याकडे ऊस गाळप करण्यासाठी ऊस उत्पादकांनी कारखान्यावर दाखविलेली विश्वासार्हता ही सुद्धा महत्त्वाची ठरली. तोडणी वाहतूक ठेकेदारांनी उन्हाची तीव्रता वाढत असतानाही शेवटपर्यंत ऊसतोड करून कारखान्यास सहकार्य केले. या हंगामात कारखान्याने 11.15% सरासरी साखर उताऱ्याने 11 लाख 52 हजार 610 क्विं. साखर पोती उत्पादित केली आहेत.
कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पानेही या हंगामात 6.31 कोटी युनिट विज निर्माण करून 2.75 कोटी युनिट एम.एस.ई.बी. ला (महावितरण) एक्स्पोर्ट केले आहेत. त्याचबरोबर आसवनी प्रकल्पातूनही 1.02 कोटी इतके उत्पादन घेतले असून अद्यापही असावनी प्रकल्प चालू आहे. आणखी पुढे अंदाजे एक महिनाभर आसवनी प्रकल्प चालणार असून कारखान्याने नव्याने 9.7 मेगावॅट उभारलेला को-जनरेशन प्रकल्पही सुरळीत चालू असून तोही आणखी महिनाभर चालेल असा अंदाज आहे. या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या ऊसास कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रक्कम रु.2800/- अदा केला असून या हंगामातील संपूर्ण गाळप झालेल्या ऊसास रक्कम रु.2800/- प्रमाणे ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांनाही संपूर्ण तोडणी वाहतूक बिलाची रक्कम अदा केली असून गळीत हंगाम 2024-25 साठी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे करार करणेस सुरुवात केली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पाण्याची पातळी दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असून, पुढील हंगामात ऊस किती शिल्लक राहिल याचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही. हा गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने कारखान्याचे चेअरमन व मार्गदर्शक मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक व व्हा. चेअरमन श्री. कैलास खुळे तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य आणि ऊस उत्पादक सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभल्यामुळे हा हंगाम यशस्वीपणे पार पाडू शकलो.
गळीत हंगाम 2024-25 हा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कारखान्यांमध्ये आवश्यक असणारी ऑफ सीझन मधील सर्व कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जातील.
डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा