*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान मोदी जाहीर सभांमधून हिंदू मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण करतायत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुस्लीम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रात साधारण 12 टक्के मुस्लीम मतदार आहेत. तर मुंबई शहरात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 22 टक्के आहे. उद्धव ठाकरे मुस्लीम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असले तरीही पारंपरिक 'हिंदू व्होट' आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपशी युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोप करण्यात आला.
हिंदुत्त्वाची व्याख्या बदलली?
बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच कडवट हिंदुत्त्वाच्या बाण्याला प्राधान्य दिलं. 'आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार' अशी बाळासाहेबांची भूमिका होती. या वक्तव्यामुळे 1995 ते 2001 पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी 'आमचं हिंदुत्व शेंडी, जानव्याचं हिंदुत्व नाही' अशी स्पष्ट भूमिका मांडलीय. इतकच नाही तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान, धर्माची आणि राजकारणाची सांगड घालून चूक केली असं विधान केलं होतं.
बाळासाहेबांचं कटवट हिंदुत्व ते उद्धव ठाकरेंचं देशप्रेमी हिंदुत्व अशा शिवसेनेच्या प्रवासामुळे मुस्लीम मतदारांचा कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने होताना दिसतोय.
कोरोना काळात इतर राज्यांच्या तुलनेत मविआ सरकारने महाराष्ट्रात केलेलं काम उल्लेखनीय होतं. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा पहिला नंबर येणं ही त्याच कामाची पोचपावती होती. दरम्यान मुस्लीम मतदारांचं ठाकरे कुटुंबाला आणि पर्यायाने त्यांच्या शिवसेनेला समर्थन हे समीकरण पहिल्यांदाच दिसून येतंय. हे समीकरण प्रत्यक्षात मतांमध्ये परावर्तित होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा