Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

*या "रामनवमी "ला हरामांची लंका जाळण्याचा संकल्प करू या.----ॲड,शीतल चव्हाण.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


*आपल्या लाडक्या श्रीरामाची राजकीय आखाड्यातून मुक्तता करीत त्यांची जनमाणसात प्राणप्रतिष्ठापना करू या*


आज 'रामनवमी'चा उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होईल. यंदा या उत्सवाला राजकीय रंग देत लोकांच्या मनातील श्रद्धेवर स्वार होवून निवडणूकांचे रण गाजवण्याचा उन्मादी संचारही सर्वत्र दिसेल. 

रामाबद्दल अनेक मतमतांतरे असली तरी भारतीय जनमानसात रामाला एक आगळेवेगळे स्थान आहे. पण अलिकडे गावखेड्यातील साध्याभोळ्या, कष्टकरी लोकांच्या 'राम राम' या स्नेहपूर्ण अभिवादनाचे रुपांतर उन्मादी, अहंकारी, हिंसक, द्वेषमूलक 'जय श्रीराम'च्या राजकीय घोषणेत करण्याचा प्रयत्न संघ-भाजपाकडून झाला आहे. लोकांच्या हृदयातील रामाला राजकीय आखाड्यात आणून संघ-भाजप पुरस्कृत 'मोशा'च्या एकाधिकारशाही 'मॉडेल'च्या प्रचाराचे 'ब्रॅंड ॲंबॅसिडर' बनवण्यात आले. 'ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या'च्या घोषारवात भारतीय श्रमिकांच्या शोषणाला 'माया' ठरवून या शोषणाचे उदात्तीकरण करणाऱ्या परंपरेने मिथ्या जगातील राजकारणात चक्क विष्णूच्या अवताराला उतरवले. देव-धर्माच्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक झालेली जगाच्या पाठीवर अलिकडच्या काळात इतरत्र पहायला मिळणार नाही. पण या फसवणूकीचे बिंग आता उघडे पडत चालले आहे. 

कारखानदाऱ्या, गुत्तेदाऱ्या आणि शिक्षण संस्थादी क्षेत्रातील मिरासदाऱ्या टिकवण्यासाठी 'ढाण्या वाघ, गब्बर, शेर' म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांनी शेपट्या घालत 'भाजप-मोशा' पुढे कुर्निसात करणे किती चटकन आणि शिताफीने कबूल केले हे अवघ्या जनतेने पाहिले. 

एरवी रांगडा गडी, हिम्मतवान वाटणारा आपला नेता वास्तवात किती शेपूळा आहे याची प्रचिती सत्ताधाऱ्यांना घाबरुन भल्याभल्या नेत्यांनी रातोरात भूमिका, पक्ष, विचार बदलल्याने तमाम जनतेला आली आहे. 

काला धन वापसी, प्रत्येकी पंधरा लाख, करोडो नोकऱ्या, शेतमालाला भाव आदी जुमलेबाजी करुन सत्तेत आलेल्या संघ-भाजप पुरस्कृत मोदी-शहा (मोशा) या जोडगळीने जीएसटी, नोटाबंदी करुन भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. जगात 'क्रूड' तेलाचा भाव घसरलेला असताना भारतात 'पेट्रोल-डिझेल'च्या दराने उच्चांक गाठला. घरगुती गॅसची उज्वला योजना घरगुती गॅसच्या भरमसाठ भाववाढीने झालेल्या ठक्क अंधारात गुडुप करुन टाकली गेली. प्रचंड वाढलेल्या महागाईने जनता मेटाकुटीला आली. खत, बी-बियाणे आदी उत्पादन खर्च वाढला पण त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढले नाहीत. उलट ते इतके कोसळवले गेले की शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार होवून बसला. 

या काळात उद्योगपतींनी मात्र विकासाची कमाल पातळी गाठली. उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जे, करसवलती, कर्ज 'व्हेव-ऑफ', सार्वजनिक मालमत्ता व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मनमानी वापराची मुभा अशा अनेक मार्गाने नफा करुन देण्यात आला. देशी-परदेशी उद्योगपतींसाठीच राज्य चालवले गेले. सर्वसामान्य जनतेला मात्र 'रामराज्या'च्या भुलथापा देण्यात आल्या. स्वत:च्या न्याय्य-हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष वागणूक देवून अक्षरशः चिरडण्यात आले. 

जे जे विरोधक या एकाधिकारशाहीविरुद्ध बोलत आले त्यांना ईडी, सिबीआय, इन्कम टॅक्स आदी स्वायत्त संस्थांचा धाक घालून अडकवण्यात आले. या स्वायत्त संस्था म्हणजे सरकारने गळ्यात पट्टे बांधलेले जणू श्वानच झाल्या.

ही सगळी मनमानी जनता गेली दहा वर्ष झाले निमूटपणे बघत आहे. ज्या नेत्यांवर भरोसा ठेवला ते या सगळ्या प्रकाराबद्दल विरोध करण्याऐवजी, रस्त्यावर उतरण्याऐवजी लुच्चेगिरी करीत शोषणकर्त्या शासनाच्या खुशामती करण्यात मश्गुल झालेले जनतेने पाहिले. 

हे सगळे चित्र पाहून जनता विषण्ण झालेली आहे. कुणावर भरोसा ठेवावा, कुणावर न ठेवावा अशा संभ्रमात गेली आहे. एक कमालीची अस्थिरता आणि असुरक्षितता भारतीय जनमनात खदखदत आहे. ही खदखद आणि रोजमर्राच्या जगण्यातील अनंत संकटे यामूळे भारतीय जनमनात जी आग निर्माण झाली आहे, तिचा अंदाज सत्तेच्या अश्वावर स्वार होवून उन्मादी चित्कार काढणाऱ्या गिधाडांना अद्याप आलेला नाही. राम-रावणाच्या कथेबद्दल अनेक मतमतांतरे असली तरी भारतीय जनता या कथेकडे अन्यायाविरुद्ध न्यायाची कथा, असत्याविरुद्ध सत्याची कथा आणि अहंकाराविरुद्ध विनम्रतेची कथा म्हणूनच पाहते. भारतीय जनमानसाच्या मनातील राम हा विनम्र, सत्यशील, अन्यायाविरुद्ध लढणारा आहे. अहंकाराचा सर्वनाश करणारा आहे. तो कधीही जुमलेबाज, लबाड, धूर्त, जनतेला लुटणारा, उन्मादी, अहंकारी नाही. मागच्या दहा वर्षातील चित्र पाहून आता जनतेला रामाच्या नावाखाली सत्ता भोगणारे हराम कोण आहेत हे पुरते कळाले आहे. 

आपल्या नेत्याच्या प्रभावाखाली, आपला नेता सांगेल त्याला मतदान करण्याची एक पद्धत भारतातील बहुतांश भागात आजही अस्तित्वात आहे. पण यावेळी आप्पलपोट्या, स्वार्थी, ढोंगी, रातोरात भूमिका बदलणाऱ्या नेत्यांची हुजरेगिरी करण्यात काही 'राम' नाही हे आता लोकांना कळाले आहे. 

ही रामनवमी राजकीय स्वार्थापोटी सत्ताधीशांनी राजकीय आखाड्यात आणलेल्या आपल्या लाडक्या रामाची मुक्तता करण्यासाठी आहे. ही रामनवमी आपल्या लाडक्या रामाची राजकीय आखाड्यातून मुक्तता करुन त्याची आपल्या हृदयात प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आहे. ही रामनवमी आपल्या मनातील आगीने अहंकारी, उन्मत्त, शोषक, लबाड सत्तेची लंका जाळण्यासाठी आहे. 

आपला जुनाच 'राम राम'चा घोष करीत हरामांच्या अहंकाराचा माज उतरवण्यासाठी ही रामनवमी आहे. 

आता रामनवमीनिमित्त हाच एक संकल्प आपण करुया. भारतीय समाजातील एकाधिकारशाही, विषमता, शोषण, सत्ता-संपत्तीचे केंद्रीकरण संपवून लोकशाही, समाजवाद आणि भाईचारा आणण्यासाठी ही रामनवमी साजरी करुया.

राम राम, जय सियाराम.


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो. 9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा