Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ मे, २०२४

*"मनुस्मृतीतील "श्लोक अत्यंत चांगले-- शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार-- शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे समर्थन तर शरद पवार यांनी यावर व्यक्त केली नाराजी.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समर्थ रामदास यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘भगवद्गीते’तील श्लोकांचा समावेश केला जाणार आहे. तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी ‘मनुस्मृती’तील श्लोकाचा वापर केला जाणार आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर हिंदू जनजागृती समितीने मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संविधान नाकारण्यासाठी मनुस्मृती आणली जात असल्याचा आरोप केला आहे.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 'एससीईआरटी'ने महाराष्ट्र राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. परंतु, यावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी ‘मनुस्मृती’ या वादग्रस्त ग्रंथामधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आता हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा मुद्दा बनला आहे. पुरोगामी विचारवंत आणि साहित्यिकांनी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने त्यास विरोध दर्शवला आहे.


दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की मनुस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी ज्या श्लोकाचा अब्यासक्रमात समावेश करण्याचा विचार केला जात आहे तो श्लोक अतिशय चांगला आहे.


दीपक केसरकर म्हणाले, मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही. तो श्लोक अतिशय चांगला आहे. त्या ग्रंथातील अनेक भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. सर्वसाधारणपणे त्यातील काही ठराविक भागांवर आक्षेप असून आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आम्ही त्याचं समर्थन किंवा प्रचार करत नाही. मनुस्मृतीतील आक्षेपार्ह मजकुराचा आम्ही प्रचार करत नाही. मात्री ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्या श्लोकात एकही चूक नाही. त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात तो श्लोक शिकवला जातोय. सीबीएसई बोर्ड तो श्लोक शिकवत आहे.


दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही या सरकारमध्ये असेपर्यंत असं काही होऊ देणार नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असेपर्यंत असं काही होऊ देणार नाही. तुम्ही (जनतेने) या गोष्टीची काळजी करू नका. आम्ही जी विचारधारा घेऊन पुढे चाललो आहोत त्या विचारधारेला कुठेही धक्का लागला तर आम्हाला ते चालणार नाही. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे हटणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा