Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

*लावणी सम्राज्ञी 'आरती काळे नगरकर 'यांना" द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड" पुरस्कार जाहीर*

 


*अकलुज - प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी


लावणी कलाक्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे लावणीसम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा द प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड हा पुरस्कार जाहीर झाला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराचे वितरण २६ मे रोजी गोवा येथे दीनानाथ मंगेशकर कला अकॅडमी पणजी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

     लावणी कला क्षेत्रामध्ये आरती काळे नगरकर यांचा नावलौकिक आहे.पारंपारिक लावणी कलाक्षेत्रामध्ये त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. अकलूज येथील लावणी स्पर्धे बरोबरच दिल्ली,आग्रा,चेन्नई, जयपूर व परदेशातही त्यांनी लावणी कलेला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.लावणी बरोबरच भरतनाट्यम् व कथ्थक या नृत्य प्रकारामध्ये देखील त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कलानिकेतन नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड,वाशी मुंबई,धुळे त्याच बरोबर राज्यातील विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. याचबरोबर संगीत नाट्य अकॅडमी नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा व नामांकित समजला जाणारा बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे.याशिवाय त्यांनी टीव्हीच्या विविध नृत्य स्पर्धेत सहभाग नोंदवून पुरस्कार प्राप्त केले आहेत.सूर्योदय,सुहासिनीची सत्वपरीक्षा,अश्रूच्या अक्षता या मराठी फिल्ममध्ये सुद्धा देखील त्यांनी कामगिरी केली आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने त्यांना यंदाचा द प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड देण्याचे जाहीर केले आहे.यामुळे लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या पुरस्काराचे वितरण गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते देण्यात येणार असून यावेळी पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक विनायक खेडेकर,केंद्रीय पर्यटन बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक,माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड.रमाकांत खलब,गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा राज्य पत्रकार युनियनचे अध्यक्ष राजतिलक नाईक,माधव आश्रम भोपाळच्या अध्यक्षा नलिनी पोतदार,भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजीव लोहार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यात लावणी कलावंत वैशाली समसापुरकर,माया अंधारे,वैशाली वाफेकर,प्रीती शिंदे,लावणी प्रशिक्षक योगेश देशमुख व पुरस्कारप्राप्त स्वतः आरती काळे या लावणी सादर करणार आहेत.वरील कलाकारांनाही भास्कर ॲवॉर्ड मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे असे भास्कर ॲवॉर्डचे प्रसिद्धी प्रमुख व लावणी कलेचे गाढे अभ्यासक, पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा