*विशेष -प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
मुंबई :--लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनी मंगळवारी (२१ मे) आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. कीर्तिकर यांच्या या दाव्याने महायुती विशेषतः शिंदे गटात खळबळ उडाली असून निवडणूक निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते, असेही कीर्तिकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जे उमेदवार दिलेले आहेत, त्यांनी चांगली लढत दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच त्यांनी यावेळी केला.
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी वडिलांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदे यांनी रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली असताना गजानन कीर्तिकर रवींद्र वायकर यांचा प्रचार करताना दिसले नाहीत. अमोल त्याची संघटना सोडून कुठेच जाणार नाही, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि मी वन टू वन भेटून देखील अमोलला सांगितले होते. पण, तो शिंदे शिवसेनेत आमच्यासोबत आला नाही, असा गौप्यस्फोटही कीर्तीकरांनी यावेळी केला.
या पार्श्वभूमीवर कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचा प्रचार करू शकलो नसल्याची खंत व्यक्त केली. या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. नुकतीच त्यांनी याबाबतची भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली होती. त्यानंतर मंगळवारी गजानन कीर्तिकर त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने शिंदे गटाच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा