Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ मे, २०२४

*"उमरगा" ही कोणाचीही खाजगी जहागिरी नाही* *इथे फतवा नव्हे तर संविधानाचा, कायदा चालतो आणि सामाजिक एकोप्याचा आवाज घुमतो---ॲड,शीतल चव्हाण*

 


*संपादक---हुसेन मुलाणी*

  *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो;--9730 867 448


महाराष्ट्रातील नावाजलेले साहित्यिक फकिरपाशा महेबूब शहाजिंदे (फ. म. शहाजिंदे) यांचा जन्म आत्ताच्या लोहारा तालुक्यातील एका छोट्याशा गावात, मुस्लिम कुटुंबात झाला. रझाकार आणि त्यानंतरच्या झगड्यात त्यांचे वडील मारले गेले. परंतू, त्यांचा सांभाळ एका हिंदू कुटुंबाने केला. उमरगा परिसरात सामाजिक एकोप्याची साक्ष देणाऱ्या अशा अनेक घटना आहेत. जातीय, धार्मिक विद्वेषाने जराशी आग भडकण्याची शक्यता वाटू लागली की त्यावर सामाजिक एकोप्याची वर्षा होवून द्वेषाची ठिणगी क्षणात विझवून टाकणाऱ्या अनंत घटना या भागात घडल्या आहेत.

या भागात हिंदू, बौद्ध, मुस्लिम, लिंगायत, जैन धर्मीय लोक तसेच मसनजोगी, मरिआई, डवरीगोसावी, भिल्ल, कोळी आदी स्थालांतरीत होवून आलेले लोकही गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. हा एकोपा कुण्या एका व्यक्तीच्या, नेत्याच्या, राजकीय पक्षाच्या अथवा घराण्याच्या मेहरबानीने निर्माण झालेला नसून अनेक लोकांच्या एकत्रित सामंजस्यातून, सहभावनेतून व सद्भावनेतून निर्माण झालेला आहे. या एकोप्याला संरक्षित करुन वृद्धिंगत करण्याचे कान भारतीय संविधानाने केलेले आहे.



सन १९८५ आणि १९९० च्या विधानसभा निवडणूकीत सगळे मातब्बर नेते एका पारड्यात असताना सुज्ञ, संयमी, अभ्यासू पण अल्पसंख्यांक अशा मुस्लिम समाजातील खालिकमियॉं काझी यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातही कॉम्रेड गफार काझी हे एकनिष्ठ नेते म्हणून शेवटपर्यंत कार्यरत राहिले. कॉम्रेड उस्मान टेलर या भारतीय कम्युनिस्ट पक्षातील मुस्लिम कार्यकर्त्याने उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले. नगर परिषदेच्या इमारतीचे काम त्यांच्याच काळात झाले. अलिकडच्या काळात अब्दुल रझाक अत्तार यांच्याकडे जनतेने नगर परिषदेचा कारभार दिला. कोरोनाच्या दोन्ही लाटेत बाबा जाफरी आणि ख्वाजा मुजावर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम केले. ईदगाह या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळात कोरोना सेंटर चालवले.

रझाकाराच्या आगीत होरपळलेल्या भागात अशाप्रकारचा हिंदू-मुस्लिम एकोपा निर्माण होणे ही वाखणण्याजोगी आणि तमाम उमरगेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. हा एकोपा बिघडवू पाहणारे पेल्यातले वादळ अनेकवेळा निर्माण केले गेले पण ते पेल्यातच शमले. पत्रकबाजी करुन तरुणांची माथी भडवणाऱ्या काही तथाकथित हिंदूत्ववाद्यांनी हुल्लडबाजीच्या जोरावर निर्माण झालेल्या प्रसिद्धीचे भांडवल करुन निवडणूकांत पैसे उकळले, पुढे त्यांना तालुक्याने थारा दिला नाही.

काल झालेल्या धाराशिव लोकसभा निवडणूकीच्या उमरगा येथील सांगता सभेत मुस्लिम मुल्ला, मौलवींनी मशालीला मतदान करण्याचा फतवा काढल्याबद्दल टीका केली गेली. मुस्लिमांनी दाढ्या राखल्या त्या केवळ आमच्यामूळे यासह या उमरग्यात फक्त मीच फतवा काढू शकतो अशी दर्पोक्तीही एका दिग्गज नेत्याने केली. वास्तविक पाहता मुस्लिमांना उमरग्यातच नव्हे तर सबंध देशात दाढ्या राखण्याचा व त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार कुण्या एका नेत्याने अभय दिल्याने मिळत नसून तो अधिकार संविधानाने दिलेल्या सरंक्षणामूळे मिळतो हे सबंधिताने नीट ध्यानात घ्यावे. उमरगाच काय सगळा देश संविधानानुसार चालतो, कुणाच्याही फतव्याने चालत नाही. संविधानाची मोडतोड करुन, सांस्कृतिक दहशतवाद माजवून, स्वायत्त संस्थांचा मनमानी वापर करुन या देशात हुकुमशाही माजवणाऱ्यांना निवडणूकांच्या माध्यमातून, लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करुन गाडून टाकण्याचे मार्गदर्शन जर का कुणी आपल्या धर्म बांधवांना करीत असेल तर अशा मुल्ला, मौलवींचा तमाम संविधानवाद्यांनी जाहीर सत्कार करायला हवा आणि अशा कृत्याला 'फतका' संबोधून, जणू काही हा 'फतवा' आतंकवाद पसरवण्यासाठीच आहे असा भास निर्माण करणाऱ्याला आणि 'फतवा' काढण्याचा अधिकार मलाच आहे अशी दर्पोक्ती करणाऱ्याला त्याची जागाही दाखवायला हवी. खरं तर मागच्या लोकसभेची उमेदवारी नाकारल्यावर नाराजीनाट्य करुनही आणि आपल्याच पक्षातील उमेदवराला मतदान करु नये असा छुपा फतवा काढूनही या फतव्याला जनतेने केराची टोपली दाखवली याचेही भान 'फतवा' मीच काढू शकतो असा अहंकार बाळगणाऱ्याने ठेवायला हवे. पण हे भान विसरुन तुम्ही दाढ्या आमच्यामूळेच राखू शकता, दंगली आमच्यामूळेच झाल्या नाहीत असे म्हणणे म्हणजे तमाम अल्पसंख्याक बांधवांना दिलेला गर्भित इशारा आहे. तोंडाने शिवरायांची भाषा बोलणाऱ्यांच्या पोटात असेही काही दडले असेल असे आम्हासही आजवर वाटले नव्हते. 

सामाजिक, राजकीय प्रक्रियेत लिहिताना, बोलताना काही वावगे घडू शकते. पण त्याची जाणीव होताच जाहीरपणे व नम्रपणे आपल्या चुकीची कबुली देवून माफी मागणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या सुसंस्कृतपणाची आणि किमान संवेदनशीलता दाखवण्याची आम्ही अजूनही अपेक्षा ठेवतो. 

देशात, राज्यात आणि इतरत्र हिंदू-मुस्लिम तणावाच्या अनेक घटना घडल्या पण त्याचा परिणाम होवून उमरगा परिसरात काहीही विपरीत घडले नाही याचे श्रेय इथल्या तमाम सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकांना जाते आणि या लोकांमध्ये संस्कार निर्माण करणाऱ्या इथल्या सहिष्णू परंपरेला जाते. 

उमरगा शहर ही कुणाची खाजगी जहागीर नसून ती सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकांची भूमी आहे. इथे कुणाचा 'फतवा' नव्हे तर संविधानाचा कायदा चालतो, सामाजिक एकोप्याचा आवाज घुमतो, सत्याची बाजू घेवून अन्यायाविरुद्ध बंड करणारा एल्गार चालतो. नेते येतात, जातात पण न्यायाचा, समतेचा, ममतेचा विचार द्वेष पसरवणाऱ्या घटनांवर मात करुन चिरकाल टिकतो. 


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो. 9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा