*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नवी दिल्ली - 08 जून :* 18व्या लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आहे. 543 नवनिर्वाचित खासदारांपैकी 46% म्हणजेच 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 27 खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, कलंकित खासदारांची ही आजपर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. यापूर्वी 2019 मध्ये फौजदारी खटले असलेले 233 (43%) खासदार लोकसभेत पोहोचले होते.
251 नवनिर्वाचित खासदारांपैकी 170 जणांवर अत्याचार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 63, काँग्रेसच्या 32 आणि सपाच्या 17 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) 7, द्रमुकचे 6, तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) 5 आणि शिवसेनेच्या 4 खासदारांची नावे आहेत.
लोकसभा निवडून आलेल्या ५४३ नूतन खासदारांपैकी तब्बल ९३ टक्के खासदार करोडपती असल्याची माहिती आहे. ९३ टक्के म्हणजे ५०४ खासदार कोट्याधीश आहेत. निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल जारी केला आहे. २०१४, २०१९ च्या तुलनेत कोट्यधीश खासदारांची संख्या यावेळी अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०१९ मध्ये ८८ टक्के खासदार कोट्यधीश होते तर २०१४ च्या लोकसभेत ८२ टक्के खासदार कोट्यधीश होते. या तुलनेत २०२४ चे प्रमाण तब्बल ९३ टक्क्यांवर गेलेले आहे. त्यामुळे यावेळी कोट्यधीश खासदारांची संख्या वाढली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या टॉप-३ श्रीमंत खासदारांची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खासदार एनडीएचे आहेत. एडीआरच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून निवडून आलेले टीडीपी खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५७०५ कोटी रुपये आहे तर तेलंगणातील भाजपच्या चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोंडा विश्वेश्वरा रेड्डी हे दुस-या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४,५६८ कोटी रुपये आहे. तसेच कुरुक्षेत्र, हरियाणाचे भाजप खासदार नवीन जिंदाल हे देशातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,२४१ कोटी रुपये आहे.
महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत खासदार कोण
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. उदयनराजे भोसले यांची संपत्ती तब्बल २२३ कोटी रुपये इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा