*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सातारा ;-- 06 जून -- ६० लाखाच्या अनुदानासाठी एक लाख रुपयांची लाच घेत असताना सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्यासोबत धनादेशसाठी १० हजार लाच मागणी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच घेताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालक डॉ.सपना सुखदेव घोळवे (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
दरम्यान, याच प्रकरणात येथील समाजकल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहायक संचालक सपना घोळवे यांनी दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली.
लाचलुचपत विभागाने बुधवारी समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले, तर समाजकल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम स्वीकारताना घोळवे यांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर लाचेची मागणी करणाऱ्या निरीक्षक दीपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा