Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ जून, २०२४

*३५१ वा शिवराज्याभिषेक दिन*सोहळा हा स्वराज्याचा* *महाराष्ट्राच्या अस्मितेचा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज, गुरुवारी (६ जून) किल्ले रायगड सज्ज आहे. शिवभक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने सोयी-सुविधांची सज्जता केली आहे. तसेच, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी सकाळपासूनच दुर्गराज रायगडावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या दर वर्षी वाढत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशस्त पार्किंगपासून एसटी बस, दिशादर्शक फलक आणि मदतीसाठी स्वयंसेवक तयार ठेवण्यात आले आहेत. पायरीमार्गे गडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या सुविधेसाठी प्रशिक्षित ट्रेकर्स सज्ज असणार आहेत. रुग्णांवर आपत्कालीन उपचारांसाठी डॉक्टर व वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात आले आहे.

सर्पदंश किंवा विंचूदंशापासून सुरक्षितेसाठी सर्पमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उष्णतेचा विचार करता गड परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनव्यवस्था असून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व वाहिन्या व सोशल मीडियावर उपलब्ध करण्यात येणार आहे. गड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे १५० पोलिस अधिकारी व एक हजार ६०० कर्मचारी, चार वाहतूक पोलिस अधिकारी व १५९ कर्मचारी, एसआरपी, एसबीआर, रायगड पोलिस दंगलनियंत्रण पथक, स्थानिक बचाव पथक व स्वयंसेवक हजर असणार आहेत. यासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. या सर्वांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.



*श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*


 *साभार--कोकण 24 तास*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा