Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ जून, २०२४

*सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी जवळ अनोळखी चरणाच्या त्याचा उलगडा तेलंगणातील आई व बहिणीने दिली होती मारेकऱ्यांना सुपारी* *आई बहिणीस हत्येची सुपारी घेणाऱ्या तिघा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448


*सोलापूर :* सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ कोणताही पुरावा मागे न ठेवता खून करून मोकळ्या जागेत टाकून दिलेल्या मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता मृत तरुण दारू पिऊन त्रास देतो म्हणून वैतागून तेलंगणातील जन्मदात्या वृद्ध आई आणि बहिणीनेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती, असे निष्पन्न झाले. आई व बहिणीसह हत्येची सुपारी घेणाऱ्या तिघाजणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.



सुकुमार व्यंकटरमणा तोराडी ऊर्फ गोड्डूरेचला (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या गुन्ह्यात त्याची जन्मदाती आई अन्नपूर्णा (वय ६०, रा. सदाशिवपेठ, जि. मेडक, तेलंगणा), बहीण विनयाकरूणा राजेंद्र चौधरी (वय ४०, रा. शेरलिंगमपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) यांच्यासह हत्येची सुपारी घेतलेल्या मोहम्मद अकबर खान व त्याचे साथीदार मुनीरअली शब्बीरअली सय्यद आणि महिबूब अब्दुल वाहीद (रा. तेलंगणा) यांना अटक करण्यात आली आहे.


गेल्या २६ मे २०२४ रोजी टेंभुर्णीजवळ एका मोकळ्या जागेत अनोळखी तरुणाचा मृतदेह खून करून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले असता तेथे मोटारकारच्या टायरच्या खुणा दिसून आल्या. मृतदेह कोणत्या तरी मोटारीतून आणून टाकल्याचा संशय आल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीफक पाटील यांनी दोन तपास पथके तयार केली. जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेकडूनही तपास केला जात होता. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनीही घटनास्थळी भेट देऊन बारकाईने निरीक्षण नोंदविले होते. गुन्ह्यात मोटारीचा वापर झाल्याचे दिसून आल्यामुळे त्या अनुषंगाने आसपासच्या रस्त्यावरील तसेच वरवडे आणि इंदापूरच्या टोलनाक्यावरील सी.सी.टी.व्ही.चे सुमारे १५ हजार फुटेज तपासण्यात आले.

 

यात संशयित मोटारकार इंदापूरच्या सरडेवाडी टोलनाक्यावरून २६ मे २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास जाताना दिसून आली. या मोटारीच्या दरवाजाच्या काचांवर टॉवेल तर मागील बाजूला कापड घातलेला होता. या मोटारीचा क्रमांकही सापडला. हीच मोटार टेंभुर्णीजवळ वरवडे टोलनाक्यावरून जातानाही दरवाजावरील काचा टॉवेलने आणि मागील भाग कापडाने झाकलेल्या स्थितीत होता. ही मोटार तेलंगणातील होती. पोलीस उपनिरीक्षक कुलदीफ सोनटक्के यांचे पथक तेलंगाणात चार दिवस तपास करीत असताना इकडे मृताच्या घेतलेल्या फिंगर प्रिंटच्या अहवालानुसार मृताचे नाव सुकुमार व्यंकटरमणा तोराडी ऊर्फ गोड्डूचेरला निष्पन्न झाले.

 

त्याची पत्नी, आई, बहीण व नातेवाईकांसह मित्र, शेजारच्या मंडळींचे जबाब नोंदविले असता आई व बहिणीने दिलेल्या जबाबात विसंगती दिसून आली. त्यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन आणि खाक्या दाखवून तपासात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सुकुमार नेहमी दारू पिऊन घरात त्रास द्यायचा. त्यामुळेच त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली आई व बहिणीने दिल्यानंतर हत्येची सुपारी घेणाऱ्या तिघाजणांचा शोध घेण्यात आला. सुकुमार यास मुंबईत नोकरी लावतो म्हणून मोटारीत बसवून सोलापूरमार्गे पुण्यात नेण्यात आले.

 तेथे चाकू खरेदी केला. नंतर पुन्हा सोलापूरच्या दिशेने येताना वाटेत टेंभुर्णीजवळ सुकुमार यास चाकूने छातीवर, गळ्यावर २५ वार करण्यात आले.

 

नंतर मृतदेह टेंभुर्णीजवळ आणून टाकण्यात आल्याचे दिसून आले. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीसह चाकू, आरोपींच्या अंगावरील कपडे, मोबाईल, मृताचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा