*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरूवारी पहाटे वसईतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. संध्याकाळी ६ वाजता विरारच्या नंदाखाल येथील चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज संध्याकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार
फादर फ्रान्सिस दिब्रिटो ( Francis Debreto ) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत त्यांच्या जेलाडी येथील राहत्या घरी ठेवण्यात येथील. त्यानंतर ४ वाजेपासून नंदाखाल (विरार) येथील पवित्र आत्म्याचे च्रच येथील अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती बिशप हाऊस मधून देण्यात आली आहे.
‘सुवार्ता’चं संपादक पद दीर्घकाळ सांभाळलं
Francis Debreto यांचा जन्म ४ डिसेंबर १९४२ या दिवशी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो १९८३ ते २००७ या कालावधीत 'सुवार्ता' या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. १९७२ या वर्षी त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख
फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु असले, तरी दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने स्वतंत्र ठसा उमटला.
'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील 'राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण' यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं प्रकाशित साहित्य
आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव)
तेजाची पाऊले (ललित)
नाही मी एकला
संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
सुबोध बायबल - नवा करार ('बायबल दि न्यू टेस्टॅमेंट' या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
सृजनाचा मोहोर
परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
मुलांचे बायबल (चरित्र)
ख्रिस्ती सण आणि उत्सव
पोप दुसरे जॉन पॉल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा