Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

राज कि बात

 


*ॲड ---शीतल चव्हाण*

  *मो--9921 657 346

राज ठाकरे आणि त्यांच्या 'मनसे'चे आस्तित्व आता त्यांच्या 'उपद्रव मूल्या'वरच टिकून आहे. मतविभागणी आणि उपद्रव टाळण्यासाठी त्यांना सोबत घेणे भाग पडणे एवढीच त्यांची राजकीय वर्तुळातील उपयुक्तता उरलेली आहे. त्यांनी कुणासोबत तरी जाणे आणि त्यांना कुणीतरी सोबत घेणे हे कधी, कोण, कसे आणि कशाच्या आधारे ठरवेल याचाही काही नेम नाही. राज ठाकरे आणि त्यांच्या 'मनसे'चे हे उपद्रव मूल्य देखील त्यांच्या भाषणाला गर्दी जमावणे, इतर सर्व पक्षाशी न जुळणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाचा लेबल देवून त्यातून मिळणारे सर्व लाभ देणे आणि निवडणूकीत कुणाला तरी आपटवण्यास पुरेशी ठरतील एवढी मतं मिळवणे या त्यांच्या 'कले'वर टिकून आहे. त्यांच्या या कलेला 'कल' कधी कुठल्या बाजूने असेल याचा कसलाही भरवसा नाही. त्यामूळे एकखांबी तंबू असलेल्या त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य दिसत नाही. 

राज ठाकरे ज्या जलद गतीने, संधीसाधूपणे, असयुक्तिकपणे भूमिका बदलतात तसे कुणी चळवळीतील, आंबेडकरी विचारधारेतील, मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा नसलेल्या नेत्यांनी केले असते तर 'मिडिया'सह सर्वांनी अशा चळवळीतील नेत्यावर एकतर यथेच्छ तोंडसुख घेतले असते किंवा अशा नेत्यांना मुख्य प्रवाहातील चर्चेबाहेर कधीचेच फेकून दिले असते. त्यामूळे राज ठाकरे यांचे उपद्रव मूल्य टिकून राहण्यामागे, त्यांनी कसलाही आधार नसताना वेळोवेळी भूमिका बदलूनही त्यांची चर्चा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असण्यामागे त्यांना उच्चजातीतील व मोठ्या राजकीय घराण्याशी निगडीत असण्याचाही लाभ झाला आहे हे भारतातील जातवास्तव, सरंजामीवास्तव व प्रस्थापितशाहीचा भारतीय राजकारणावर असलेला प्रभाव नाकारुन चालणार नाही.

एकेकाळी मोदींवर 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत तुटून पडणाऱ्या, 'भाजप-मोशा'चा मुंबई तोडण्याच्या आणि गुजरातला मोठ्ठं करण्याच्या मनसुब्यावर सडकून टिका करणाऱ्या राज ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित 'महायुती'च्या रेल्वेला आपल्या पक्षाचे इंजिन 'बिनशर्त' जोडून पळवले. वेळोवेळी वेगवेगळ्या युत्या, आघाड्यांचे रेल्वेडबे पळवणाऱ्या त्यांच्या इंजिनाला कुठले इंधन लागते, ते कोण घालते, कशासाठी घालते आणि त्यांच्या इंजिनात बिघाड पाडण्याचा दम देवून कुठले-कुठले 'दबावतंत्र' वापरले जाते ही बाब आता सुज्ञ मतदारांसाठी 'राज की बात' राहिलेली नाही. 

काल राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणूकांत स्वबळावर निवडणूका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. लगेच दिपक केसरकरांनी 'आम्ही राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करु' असे 'मिडिया'समोर सांगितले. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होते की ते त्यांच्या 'मता(!)'वर ठाम राहतात हा आणि त्यामागचा काळाच्या पोटात दडलेला 'राज'ही उघड होईलच. तोवर राज ठाकरेंच्या मनोरंजनात्मक भाषणांचा आस्वाद घेत राहूया.


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो. 9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा