*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राज्यातील दोन लाख २१ हजार ११२ अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना मानधन वाढीचा व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला. मात्र, त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढविली असून किमान ११ वर्षे सेवा झालेल्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना किमान ८० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही, असे शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पाअंतर्गत एक लाख १० हजार ५५६ अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के निधी दिला जातो. दोन लाख कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून १ ऑक्टोबरपासून अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस महिलांना वाढीव मानधन दिले जाणार आहे.
या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन दहा हजारांवरून १३ हजार तर मदतनीस यांचे मानधन साडेपाच हजारांवरुन साडेसात हजार रुपये झाले आहे. मात्र, ११ ते २० वर्षे सेवा झालेल्यांना तीन टक्के, २१ ते ३० वर्षे सेवा झालेल्यांना चार आणि ३० वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पाच टक्के वाढ मिळणार आहे. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार नाही. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानंतरही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
८० टक्के गुण मिळाले तरच प्रोत्साहन भत्ता
घरपोच आहार, वृद्धी सनियंत्रण क्षमता वाढविणे, तीन ते सहा वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण सुधारणे, गरम ताजा आहार देणे, आहार आरोग्य दिवस साजरा करणे, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, शासनाच्या अन्य योजनांबाबतची कामे, पोषण ट्रॅकवरील दरमहा अहवाल भरणे, स्थूल, लठ्ठल बालके व खुज्या बालकांचे प्रमाण कमी करणे, अशा १० बाबींसाठी प्रत्येकी १० गुण असणार आहेत. दुसरीकडे मदतनीसांना अंगणवाडी उघडणे (महिन्यात किमान २५ दिवस), गरोदर महिलांच्या वजनाची नोंद घेण्यासाठी सेविकांना मदत करणे, बालकांच्या वयानुसार उंची, वजनाची नोंद घेण्यास मदत करणे), शासनाच्या अन्य योजनांच्या कामात सेविकांना मदत करणे, अशा पाच बाबींसाठी प्रत्येकी २० गुण आहेत. त्यात किमान ८० टक्के गुण आवश्यक असून त्याशिवाय प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही, असे शासन आदेशात नमूद आहे.
असा असेल प्रोत्साहन भत्ता
गुण अंगणवाडी सेविका मदतनीस
८० टक्के १६०० रुपये ८०० रुपये
९० टक्के १८०० रुपये ९०० रुपये
१०० टक्के २००० रुपये १०० रुपये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा