*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
------- जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू नये या दृष्टीने सर्व न्यायालयांमध्ये पायाभूत सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. तसेच वाढती खटल्यांची संख्या याकडे सकारात्मकतेने पाहताना सर्वसामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते ढेरे यांनी केले.
इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते संपन्न आले.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,खासदार सुप्रिया सुळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप वि.मारणे, न्यायमूर्ती आरिफ सा.डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश महेंद्र के.महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने, ॲड.विजयराव मोरे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, पक्षकारांना तारीख पे तारीख देऊ नका अशाने त्यांची कोर्टाची पायरी चढू नये अशी भावना निर्माण होते. सर्वांच्या मदतीने केसेस निकाली काढाव्यात वकील हा केसचा शिल्पकार असतो. अपीलात गेलेल्या नवीन विना अनुभवी वकील धडाधड अंगावर येणारे प्रश्न विचारतात. त्याने त्यांचे आणि पक्षकारांचे देखील नुकसान होते जास्तीचा आत्मविश्वास नसावा. यासाठी नवीन वकिलांनी जेष्ठ अनुभवी वकिलांकडून शिकणे गरजेचे आहे. शॉर्टकट मारण्याने थोडे दिवस ते टिकेल एकदा का कोर्टाचा विश्वास तुमच्यावरचा निघून गेला तर तो कधीही येणार नाही. पक्षकारांना हे होईलच असे वचन देऊ नका अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले. इंदापूर न्यायालयाने कोणताही आडकाठी न आणता जिल्हा सत्र न्यायालयासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिली ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यापुढे पक्षकारांना केसेस लढवण्यासाठी पुण्याला जावे लागणार नाही त्याचा निपटारा इंदापूरतच होणार आहे. यावेळी पक्षकारांना वेळीच न्याय मिळण्यासाठी सरकारने सुविधा दिल्या पाहिजेत सरकारने हे काम हाती घेतले आहे जुन्नर, शिरूरला देखील अतिरिक्त सत्र न्यायालय होणार आहे पुणे जिल्हात 153 न्यायाधीश आहेत त्यापैकी 80 पुणे शहरात आहेत त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवण्यात येईल तसेच इंदापूरला आवश्यक असणारे सर्व मदत करण्यास तयार आहे. यामध्ये न्यायालयाच्या इमारतीसाठी आठ कोटी निधीची आवश्यकता आहे तसेच सभागृहासाठी चार कोटी रुपये आवश्यक आहेत प्रस्ताव पाठवा येणाऱ्या अर्थसंकल्पात तो मंजूर करू. तसेच जिल्हा नियोजन मंडळातून वकिलांसाठी शेड उभारणीसाठी वीस लाख रुपयांचा निधी देखील मंजूर केला जाईल अशी ग्वाही दिली.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आजचा इंदापूर न्यायालयाचा इतिहास सर्वात आनंदचा क्षण आहे. 2014 ला आमदार झाल्यानंतर इमारतीची मागणी केल्याने 19 कोटी रुपये इमारतीला मंजूर केले. कोरोना काळातही अजित पवारांनी निधी कमी पडू दिला नाही. पूर्वी पुण्याला जावे लागत होते तो त्रास वकिलांना यापुढे होणार नाही. इंदापूर वकील संघटनेने ज्या मागण्या केल्या आहेत त्या सोडवल्या जातील.
-
चौकट - इमारतीची रचना आणि दर्जाबाबत अजित पवारांकडून नाराजी..
आपल्या रोखठोक स्वभाव आणि चाणाक्ष नजर यासाठी परिचित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी प्रवेशद्वारातून आत जाताच पडत असलेल्या अंधाराचा धागा पकडत कुठल्या शहाण्याने वास्तू तयार केली त्यालाच माहिती असं म्हणत सकाळी 11 वाजताच आत मध्ये अंधार पडतोय असा टोला लगावत. इंदापूरच्या न्यायालयाच्या इमारत कामाची रचना व दर्जा याबाबत संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
-
छायाचित्र - इंदापुर येथे न्यायालयाचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व इतर मान्यवर
---------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा