*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
नवी दिल्ली : सोलापूर जिल्ह्यातील सुरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या बिनशेती (एनए) भूखंडांबाबत योग्य भरपाई मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.
मौजे हसापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर (गट क्र. ८९/२) येथील भूखंडधारकांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अधिग्रहणाच्या आधीपासून सदर जमिनी बिनशेती (एनए) म्हणून रूपांतरित असतानाही त्यांना चुकून शेतीजमीन म्हणून संपादित करण्यात आले. त्यामुळे संबंधितांना शेती जमिनीच्या दरानेच भरपाई मंजूर करण्यात आली.
१०३ भूखंडधारकांपैकी ८१ भूखंड आणि काही जमिनी पूर्णपणे अधिग्रहित झाल्या असून खऱ्या जागा मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जमिनींचे एनए असल्याबाबतची सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर केल्यानंतरही भूसंपादन कार्यालयाने शेती दरानेच भरपाई मंजूर केली आहे.
यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, अधिग्रहित जमिनी बिनशेती (एनए) असल्यामुळे योग्य व न्याय्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या निवेदनातून गडकरी यांच्याकडे केली आहे.
यावेळी प्रकल्पग्रस्त रमेश जाधव, भीमराव बाळगे, सुभाष काळे, गुरुनाथ जाधव, यश जाधव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा