*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दोन दिवसांपूर्वी एसटी बँकेतील एका निरीक्षकाला लाच मागणी प्रकारात अटक केल्यानंतर एसटी विभागात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकारामागे ॲड गुणरत्न सदावर्ते आणि एसटी बँकेचे संचालक संजय घाटगे यांचाच हात असल्याचा आरोप शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी कोल्हापुरात केला आहे. हेतुपुरस्सर एसटी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदली केल्यानंतर त्यांना पुन्हा सोयीस्कर ठिकाणी बदली करण्यासाठी ॲड सदावर्ते आणि घाडगे हे कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप देखील यावेळी संतोष शिंदे यांनी केला आहे. तसेच बदली करण्यासाठी पैसे मागणाऱ्यांचे कॉल रेकॉर्डींग मीडियासमोर सादर केले.
शनिवारी (ता.11) लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई विभागाने एसटी बँकेचे निरीक्षक राहूल रमेश पुजारी यांना एक लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणावर संतोष शिंदे यांनी ॲड.गुणरत्न सदावर्ते आणि एसटी बँकेचे संचालक संजय घाटगे यांच्यावर आरोप केले आहेत.
एसटी बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बँकेचे संचालक संजय घाटगे आणि गुणरत्न सदावर्ते हे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करतात. पुन्हा स्वतः च्या जवळच्या शाखेमध्ये बदली करण्यासाठी राहुल पुजारी, मिरज शाखेतील कर्मचारी अनिल कोळी यांच्यामार्फत बदली इालेल्या कर्मचाऱ्यांकडे पैश्याची मागणी करत असल्याचा आरोप संतोष शिंदे यांनी केला.
बदलीसाठी मिळालेली रक्कम संजय घाटगे आणि गुणत्न सदावर्ते यांना पोहोच करतात. जे कर्मचारी पैसे देणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या जातात. असा आरोपही करत संतोष शिंदे यांनी केला.
कर्मचाऱ्यांना पैसे मागणी करणारे राहूल पुजारी आणि अनिल कोळी यांचे कॉल रेकॉर्डींग मीडियाला संतोष शिंदे यांनी दिले आहे.
कॉल रेकॉर्डींगमध्ये काय?
कॉल रेकॉर्डींगमध्ये राहुल पुजारी आणि अनिल कोळी हे मागणी केलेले पैसे संचालक संजय घाटगे तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना द्यावे लागणार, असे सांगत असल्याचे संभाषण आहे.
कर्मचाऱ्यांच्या नावे पाठवतात पैसे?
कर्मचाऱ्यांना भीती दाखवून त्यांच्या नावावर बँकेत चुकीच्या पद्धतीने पैसे जमा केले जातात, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसै घेतले जातात. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 75 हजार रुपये खात्यावर जमा केले जातात. आणि तेही पैसे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांमार्फत अनिल कोळी , संजय घाटगे यांच्याकडे पाठविले जातात, असा आरोप संतोष शिंदे यांनी केला तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदावर्ते, घाटगेंनी आरोप फेटाळले
संचालक संजय घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा झालेला प्रकार कोल्हापूर आणि जिल्ह्यातील कोणत्या शाखेत झालेला नाही. पुजारी हा कोल्हापूरचा रहिवासी असल्याने शिंदे यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याचा राग मनात धरल्याने आमच्या विरोधात कुरघोड्या सुरू आहेत. जर झालेल्या प्रकारात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई व्हावी.
गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले. संतोष शिंदेवर निशाणा साधत ते म्हणाले, ज्यांना स्वतःची इज्जत राखता येत नाही त्यांनी दुसऱ्यावर काय बोलू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा